सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा 

By नामदेव मोरे | Published: December 28, 2023 09:38 AM2023-12-28T09:38:46+5:302023-12-28T09:41:04+5:30

दोन मजल्यांवर दारूच्या बाटल्यांचा खच

cannabis smoke is coming out of sanpada railway station building is a haven for nashedi | सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा 

सानपाडा रेल्वे स्थानकातून निघतोय गांजाचा धूर! इमारत  नशिडींचा अड्डा 

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सानपाडा रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये अवैध व्यवसायाचा अड्डा तयार झाला आहे.  पूर्व बाजूला दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील प्रशस्त हॉलचे खंडहरात रूपांतर झाले आहे. येथे गांजा व इतर अमली पदार्थ ओढणाऱ्यांचा वावर वाढला आहे. इमारतीमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत असून याकडे सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. 

नवी मुंबईमध्ये सिडकोने भव्य रेल्वेस्थानके उभारली आहेत. परंतु, अनेक ठिकाणी  इमारतीमधील व्यावसायिक गाळ्यांचा योग्य वापर करता येत नाही. सानपाडा रेल्वेस्थानक इमारतीच्या पूर्व बाजूच्या ए, बी व सी विंगच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील दोन प्रशस्त हॉलचा वापर केला जात नाही. भाडेतत्त्वावरही ही जागा देण्यात आलेली नाही. या दोन्ही कार्यालयांना कुलूप लावलेले नाही. इमारतीच्या छतावरील कुलूपही गायब झाले असल्यामुळे तेथे कोणालाही सहज जाता येते. मागील काही महिन्यांपासून या मोकळ्या गाळ्यांमध्ये  गांजा व इतर अमली पदार्थ ओढणाऱ्यांची ये-जा वाढली आहे. मद्यपींचाही येथे अड्डा तयार झाला आहे. इमारतीच्या पडीक गाळ्यांमध्ये कुटुंब नियोजनाची पाकिटेही आढळू लागली आहेत. तसेच संपूर्ण इमारतीचे कचराकुंडीत रूपांतर झाले आहे. 

सुरक्षारक्षक गेले कुठे?

इमारतीमधील मोकळ्या जागेत गांजा व इतर अमली पदार्थ ओढण्यासाठीचे सिगारेट तयार करण्यासाठीच्या पेपरचे बॉक्स पडलेले आढळत आहेत. यामुळे येथे बिनधास्तपणे अमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक वेळा येथून गांजाचा उग्र दर्प येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. इमारतीच्या सुरक्षेची जबाबदारी सिडकोच्या सुरक्षारक्षकांची आहे. संपूर्ण इमारतीची स्वच्छता करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. पण, ठेकेदारही या परिसराची स्वच्छता करत नाही. सुरक्षारक्षक  या ठिकाणी कधीच फिरकत नसल्यामुळे अमली पदार्थ ओढणाऱ्यांसाठी ही सर्वांत सुरक्षित जागा झाली असून, हे अड्डे बंद करण्याची मागणी केली जात आहे.

१० ते १५ रुपयांमध्ये मिळतो रोल

पूर्वी गांजा ओढण्यासाठी चिलमीचा वापर केला जात होता. पण, आता १० ते १५ रुपयांमध्ये विविध कंपन्यांचे रोल मिळत आहेत. विविध फ्लेव्हरमध्ये हे रोल मिळतात. त्याला सिगारेटचा आकार देऊन गांजा व इतर अमली पदार्थ ओढण्यासाठी वापर केला जातो. अशा प्रकारचे अनेक रोलचे बॉक्स इमारतीमध्ये पाहावयास मिळतात. 

कार्यालयांचा शौचासाठी वापर 

सानपाडा स्थानकांत लहान कार्यालयासाठीही २० ते ३० हजार रुपये भाडे द्यावे लागते. पण, पूर्व बाजूला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर लहान कार्यालयाच्या ४० ते ५० पट मोठ्या हॉलचा काहीच उपयोग केला जात नाही. अमली पदार्थ ओढणाऱ्यांनी या दोन्ही सभागृहांचे खुले शौचालय बनविले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

सानपाडा रेल्वे स्थानक इमारतीमधील मोकळ्या कार्यालयां मध्ये दारूच्या बाटल्या व इतर साहित्य पडले आहे. येथे अमली पदार्थ ओढणाऱ्यांचा वावर असतो. सिडको, रेल्वे प्रशासन व पोलिसांनीही हे प्रकार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. - किरण ढेबे, सामाजिक कार्यकर्ते 


 

Web Title: cannabis smoke is coming out of sanpada railway station building is a haven for nashedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.