फेशियल करायला आली आणि घर लुटून गेली

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 25, 2024 19:18 IST2024-02-25T19:18:05+5:302024-02-25T19:18:31+5:30

आसुडगाव मधील घटना : घरातून ११ लाखांचे दागिने लंपास

Came for a facial and rob the house | फेशियल करायला आली आणि घर लुटून गेली

फेशियल करायला आली आणि घर लुटून गेली

नवी मुंबई : घरामध्ये चालणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये फेशियल करण्यासाठी आलेल्या महिलेने काही मिनिटात घरच साफ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

आसुडगाव येथे राहणाऱ्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. सदर महिलेकडून माहेरच्या घरातच ब्युटी पार्लरच्या सुविधा पुरवल्या जातात. काही दिवसांपूर्वी त्यांची इंस्टाग्रामवरून एका महिलेसोबत ओळख झाली होती. या महिलेने १५ फेब्रुवारीला त्यांना संपर्क साधून फेशियल तसेच वॅक्स करून घेतले होते. त्यानंतर २३ फेब्रुवारीला या महिलेने पुन्हा त्यांना फोन करून फेशियल व इतर सुविधा घ्यायचे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सदर महिला घरी आली असता तिने एसी मध्येच फेशियल करायचे असल्याचे सांगितल्याने तिला बेडरूम मध्ये नेले होते.

त्याठिकाणी फेशियल, वॅक्स व इतर सुविधा घेतल्यानंतर अंग चिकट झाले असून ते पुसण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये ती एकटीच होती. काही वेळाने ती घाईत बाहेर निघून पैसे देऊन निघून गेल्यानंतर घरातील व्यक्तींना कपाटात दागिने आढळून आले नाहीत. यामुळे तिला फोन करून परत बोलवले असता टाळाटाळ केली. अखेर पाठलाग करून एका ठिकाणी तिला ताब्यात घेऊन दागिन्यांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून तिने फेशियल व इतर सुविधा घेण्याच्या बहाण्याने बेडरुमध्ये येऊन दागिन्यांची चोरी केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Came for a facial and rob the house