ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर होणार बिझनेस हब; तब्बल १३०० एकर जागेची निवड
By नारायण जाधव | Updated: November 2, 2025 10:50 IST2025-11-02T10:50:02+5:302025-11-02T10:50:32+5:30
बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती उभारला जाणार हब

ठाणे-नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर होणार बिझनेस हब; तब्बल १३०० एकर जागेची निवड
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: बुलेट ट्रेनच्या ठाणे स्थानकाभोवती १३०० एकरच्या विस्तृत क्षेत्रात मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर नवे बिझनेस हब विकसित करण्यात येणार आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल महापालिकेच्या वेशीवर हे नवे बिझनेस हब विकसित करण्यात येणार असल्यामुळे चारही महानगरांच्या विकासाला गती मिळणार आहे.
नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली असून जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायकाच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील बीकेसीपेक्षासुद्धा एक पाऊल पुढे असलेले हे नवे बिझनेस हब अत्याधुनिक असणार आहे. यामुळे ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर अधिक प्रगत व आंतरराष्ट्रीय दर्जाचा बिझनेस हब असलेला जिल्हा ओळखला जाणार आहे.
'या' १० गावांच्या विस्तीर्ण जमिनी संपादित करणार
ठामपा व केडीएमसी हद्दीतील दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद, काटई यासारख्या गावांचा परिसरातील १३०० एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात या बिझनेस हबची रूपरेषा आखण्यात येत आहे. जपानच्या जायका इंटरनॅशनल सहकार्याने ठाणे महापालिकेची यासाठी नोडल एजन्सी म्हणून निवड केली. त्यांनी नुकतीच भूसंपादनासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
उद्योगांमुळे रोजगाराच्या संधीत होणार वाढ
वाहतूक नियोजनासाठी १३ वेगळ्या उपाययोजना तयार केल्या आहेत, ज्या भविष्यातील गर्दी व वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रभावी ठरतील. तसेच, निळजे ग्रोथ सेंटर, ऐरोली काटई मार्ग, तसेच कल्याण-तळोजा मेट्रो लाइन या सर्वांच्या भूमिकाही नव्या व्यवसाय जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण राहणार आहेत. सिडकोच्या खारघर येथील प्रस्तावित कार्पोरेट पार्कला ते जोडले जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते, नव्या बिझनेस हबची संकल्पना ठाणे शहराला आर्थिकदृष्ट्या नवीन उंचीवर नेईल.