खारघर शहरात ९ ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज, रोख रक्कम लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:17 IST2025-07-04T18:17:10+5:302025-07-04T18:17:41+5:30
टोळीने एकापाठोपाठ घरे फोडली

खारघर शहरात ९ ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज, रोख रक्कम लंपास
लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: खारघर शहरात एकाच रात्री ९ ठिकाणी घरे फोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे..खारघर वास्तूविहार सेक्टर १६ येथील संस्कृती को.ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी बंद असणार्या 5 घरा मध्ये घरफोडय़ा झाल्या तसेच पारिजात को. ऑप हौ.सोसायटी या ठिकाणी ४ घरांमध्ये दि.३ रोजी मध्यरात्री ३ च्या सुमारास या घरफोड्या करण्यात आल्या आहेत.
घरफोडी करण्यात आलेले बहुतांशी घरे बंद होती.विशेष म्हणजे चोरटयांचा याठिकाणी सर्रास वावर दिसत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या परिसरात वारंवार घरफोड्या होत असताना पोलीस करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.चोरट्याना पोलिसांची भीती नसल्यानेच चोरटे सर्रास हत्यार घेऊन चोऱ्या करीत असल्याचे स्थानिक माजी नगरसेवक संजना समीर कदम यांनी सांगितले.शहरात वारंवार अशा घटना घडत आहेत.
याबाबत मनसेचे गणेश बनकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.रहिवाशांच्या तक्रारीनुसार खारघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.या जबर चोऱ्यांच्या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.चोरट्यांच्या हातात असलेले धारदार शस्त्र पाहून विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.चोरी झालेल्या घरांमधील बहुतांशी रहिवासी गावी गेल्याने अद्याप कोणाच्या घरी किती लाखांचा ऐवज चोरी झालाय याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
चोरट्यांना पोलिसांची भीती नसल्याने धारदार शस्त्र घेऊन त्यांनी 9 ठिकाणी घरफोडी केली.या प्रकारामुळे सर्व रहिवासी घाबरले आहेत.चोरटे सीसीटीव्हीत कैद्य झाले आहेत.त्यामुळे पोलिसांनी तपासाला गती देऊन या चोरट्यांचा छडा लावावा.अन्यथा अशाच घटना शहरात इतर ठिकाणी होतील. - संजना समीर कदम (माजी नगरसेविका ,खारघर )