महापौरांचा मुख्यालयावर बहिष्कार
By Admin | Updated: October 6, 2016 03:58 IST2016-10-06T03:58:56+5:302016-10-06T03:58:56+5:30
महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात

महापौरांचा मुख्यालयावर बहिष्कार
नवी मुंबई : महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी व प्रशासनामधील वाद विकोपाला गेले आहेत. सर्वसाधारण सभेच्या व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आदर केला जात नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाची मनमानी थांबेपर्यंत पालिका मुख्यालयामध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांचाही अवमान होत असल्यामुळे शहरवासीयांमध्येही असंतोषाची भावना वाढू लागली असून त्याचा उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील संवाद पूर्णपणे थांबला आहे. पालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यापासून लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये संवाद निर्माण व्हावा यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रयत्न केले. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांच्या सूचनांचा आदर करत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या होत्या. पण आता तर प्रशासनातील इतर अधिकारीही लोकप्रतिनिधींचे मत एकूण घेत नाहीत. काहीही काम सुचविले तरी आयुक्त रागावतील असे सांगून टाळले जात आहे. यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसेल व प्रशासन मनमानीपणे कामकाज करणार असेल तर आम्ही पालिकेत जायचेच कशाला असा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत प्रशासन लोकप्रतिनिधींचा योग्य आदर करणार नाहीत, तोपर्यंत पालिकेत जाणारच नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. महापौरांच्या या भूमिकेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयाविषयी माहिती देताना महापौर सुधाकर सोनावणे यांनी मे महिन्यापासूनचा घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्याप एकदाही भेट घेतलेली नाही. ज्या दिवशी पदभार स्वीकारला त्या दिवशी महापौर स्वत:च आयुक्तांच्या घरी जावून त्यांना भेटले. यानंतरही आयुक्तांनी त्यांची कधीच भेट घेतलेली नाही. यामुळे पुन्हा एकवेळ त्यांच्या निवासस्थानी जावून शहरातील समस्यांवर चर्चा केली. कधीच संवाद होतच नसेल व आम्ही सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयांचीही अंमलबजावणी होत नसल्याने फक्त खुर्चीवर बसण्यासाठी पालिकेत जावू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)