अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 05:45 IST2025-09-16T05:42:02+5:302025-09-16T05:45:02+5:30
नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक मिक्सर ट्रक लक्झरी कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली.

अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
नवी मुंबई/पुणे : ऐरोली येथील मिक्सर चालकाच्या अपहरणात निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर व बाउन्सर प्रफुल्ल साळुंखे यांचे नाव निष्पन्न झाले आहे. या दोघांचाही रबाळे पोलिस शोध घेत आहेत. तपासादरम्यान रबाळे पोलिसांची अडवणूक केल्याप्रकरणी पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अपहरणाच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी केल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक मिक्सर ट्रक लक्झरी कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर रबाळे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खरात यांचे पथक खेडकर यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चौकशीसाठी पाेहोचले. त्या ठिकाणी त्याला डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याच्या सुटकेसाठी व गाडीचा ताबा देण्यासाठी पूजाची आई मनोरमा खेडकर यांनी असहकार्य करून अडथळा केला.
चतु:शृंगीत गुन्हा
या प्रकरणी रबाळे पोलिसांच्या तक्रारीवरून पुण्याच्या चतुःशृंगी पोलिस ठाण्यात मनाेरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यातील पती व त्यांचा बाउन्सर यांना सहकार्य केल्याप्रकरणीही रबाळेच्या गुन्ह्यात त्यांना सह आरोपी केल्याचे उपायुक्त डहाणेंनी सांगितले.
फिर्यादीत काय म्हटलंय?
सहायक निरीक्षक दिलीप खरात यांनी फिर्यादीत म्हटले, मनोरमा यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला.
चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत खेडकर यांनी अपहरण करणाऱ्या कारचालकला पसार होण्यास मदत केली. आरोपी कार घेऊन पसार झाला. तसेच बंगल्यात पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला.