तळोजामधील चौघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 23:55 IST2020-02-29T23:55:11+5:302020-02-29T23:55:18+5:30
तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या पतीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळोजामधील चौघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
पनवेल : तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या पतीविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत इसमाचे नातेवाईक यांना दिल्लीहून पोलिसांनी तळोजा येथे बोलावले होते. त्यांच्याकडे चौकशी करून त्यांनी हे पाऊल का उचलले याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
दरम्यान, मृत नीतेश कुमार उपाध्याय याचा गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या नातेवाइकांशी संपर्क झाला नसल्याचे उघड झालेले आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून, या घटनेमुळे पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली होती. आठ दिवसांनंतरही हत्या व आत्महत्येची माहिती मिळालेली नसल्याने पोलिसांसमोर याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे.
मयत नीतेश कुमार यांचा भाऊ रत्नेश याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी आत्महत्या का केली असेल, तसेच पत्नी व मुलांना का मारले असेल, याची माहिती रत्नेशकडून घेतली असता कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तळोजा पोलिसांनी या चौघांचे मृतदेह भाऊ रत्नेश याच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांनी दिली.