भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
By नारायण जाधव | Updated: August 29, 2025 07:10 IST2025-08-29T07:08:28+5:302025-08-29T07:10:59+5:30
सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह लावले आहेत.

भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
- नारायण जाधव
नवी मुंबई - सकल मराठा समाजाचे भगवे वादळ नवी मुंबईत गुरुवारी दाखल होण्याआधीच भाजपने डॅमेज कंट्रोलचे हत्यार उपसले आहे. याचाच एक भाग म्हणून इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, असे ठळकपणे लिहिलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह लावले आहेत.
भाजपचे आमदार तथा माथाडी नेते नरेंद्र पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. प्रसाद लाड यांच्या नावासह हे होर्डिंग, बॅनर लावले आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीस यांना व्हिलन ठरविण्याचा आणि त्यांना शिवीगाळ केल्याचे प्रकार घडल्यानंतर भाजपने अशा नेत्यांना या बॅनरच्या माध्यमातून उत्तर देत डॅमेज कंट्रोल' साधल्याचेही बोलले जात आहे.
माथाडींचाही पाठिंबा
नवी मुंबईत पनवेल-सायन महामार्गावर मोक्याच्या ठिकाणांवर लागलेल्या या बॅनरवर नाव असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचे वडील स्व. अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणासह माथाडी कायद्याची मागणी केली होती. आता याच अण्णासाहेबांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे. एवढेच नव्हे काही वर्षांपूर्वी पाटील यांनी आपल्या हातावर देवेंद्र फडणवीस यांचे नावसुद्धा गोंदवून घेतलेले आहे.
आरक्षणाबाबत काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी
काँग्रेसने मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे तसेच नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षण कमी करण्याच्या चळवळीला पाठिंबा दिला का, हे स्पष्ट करावे. काँग्रेसने अशी नौटंकी करणे आणि सरड्यासारखे पलटणे हे संभ्रम निर्माण करणारे आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
मर्यादा हटवा, आरक्षण द्या
सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे, हे खा. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात तसे काम सुरू आहे. भाजप सरकारने जातनिहाय जनगणना करावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस