डंपरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; उलवे येथील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 24, 2023 19:36 IST2023-07-24T19:35:53+5:302023-07-24T19:36:20+5:30
रस्त्यावरच उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.

डंपरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; उलवे येथील घटना
नवी मुंबई: रस्त्यावरच उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढला असून त्याच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे येथील तरघर पुलावर रविवारी रात्री हा अपघात घडला आहे. उलवे परिसरात राहणारा भीमराव शिरसाट (२४) हा मोटरसायकलने चालला होता. यावेळी तरघर पुलाच्या उताराला रस्त्यालगत उभ्या असलेल्या डंपरला त्याची दुचाकी धडकली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असता नातेवाईक व नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रस्त्यालगत डंपर उभा करून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी डंपर चालकावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगत डंपर उभे केले जात आहेत. यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारे अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी देखील अशा अपघातांमध्ये काहींनी प्राण देखील गमावले आहेत. त्यानतरही सदर मार्गावर डंपर चालकांना मिळणारी सूट इतर वाहनचालकांची जीवघेणी ठरत आहे.