बाप्पा मोरया रे
By Admin | Updated: September 14, 2015 04:11 IST2015-09-14T04:11:04+5:302015-09-14T04:11:04+5:30
762 गणेशमूर्तिकार जिल्ह्यातील १५ तालुक्यांत आहेत तर या व्यवसायात व्यस्त कामगारवर्ग जवळपास १० हजार आहे. या ७६२ गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये यंदा

बाप्पा मोरया रे
762 गणेशमूर्तिकार जिल्ह्यातील १५ तालुक्यांत आहेत तर या व्यवसायात व्यस्त कामगारवर्ग जवळपास १० हजार आहे. या ७६२ गणेशमूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये यंदा एकूण १७ लाख २४ हजार ३०० गणेशमूर्तींची निर्मिती झाली असून पेण शहर वगळता ही आर्थिक उलाढाल तब्बल ७ कोटी २० हजार रुपयांच्यावर आहे. लोकमत चमू सर्वेक्षणातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात पेणवगळता सर्वाधिक १०० गणेशमूर्तिकार कर्जत तालुक्यात आहेत, तर सर्वाधिक ३० हजार गणेशमूर्तींंची निर्मिती करुन पनवेल तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील घरगुती गणेशोत्सवाचा वेध ‘लोकमत’चमुने घेतला आहे.
जिल्ह्यात पेण हे शहर गणेशमूर्ती निर्मितीचे जागतिक कीर्तीप्राप्त केंद्रच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गणेशमूर्ती निर्मितीचा उद्योग प्रचंड मोठा आहे. विघ्नहर्त्या गणपतीवर असलेल्या असीम श्रद्धेतून गणेशमूर्ती घरोघर आणून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात असल्याने येथील गणेशोत्सव निर्मितीचा व्यवसाय देखील जिल्ह्यात दोनशे वर्र्षांपासूनचा असल्याचे सांगितले जाते. येत्या गुरुवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे.
20कोटींची सर्वाधिक आर्थिक उलाढाल पनवेल तालुक्यात होणे अपेक्षित आहे. तर त्या खालोखाल अलिबाग तालुक्यात सव्वा कोटी रुपयांची उलाढाल आहे. पूर्वी रायगडचे हे गणेशमूर्तिकार स्थानिक पातळीवरच गणेशमूर्तींची निर्मिती करीत असत मात्र आता पेण व हमरापूर येथून गणपतीच्या कच्च्या मूर्ती आणून आपापल्या गावी रंगकाम करुन विक्री करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. काही जण तर थेट पेण येथूनच तयार गणेशमूर्ती आणून विक्री करण्याचा व्यवसाय करीत आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव निर्मीतीचा व्यवसाय दोनशे वर्षापासूनचा असल्याचे सांगितले जाते.
तळा : तालुक्यात अंदाजे १० गणेशमूर्तींचे कारखानदार आहेत. वसंत पोळेकर हे गेली ४५ वर्षे गणेशमूर्तीचा कारखाना चालवत आहेत. तर त्यांचे कारखान्यात लहान मोठ्या सुमारे १२०० गणेशमूर्ती तयार करत आहेत. सतीश शिंदे हे जवळपास १५ वर्षे कारखाना चालवत असून ५०० च्या जवळपास मूर्ती तयार करताना. किरण सातांबेकर हे जवळपास ३० वर्षे कारखाना चालवत असून ४०० गणेशमूर्ती तयार करीत आहेत. तळे येथे एकूण चार हजाराच्या आसपास गणेशमूर्ती तयार होत आहेत. पूर्वी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जात असत. परंतु आज शाडूची माती महाग झालेली आहे आणि कारागीर मिळत नाहीत. त्यामुळे बहुतांशी कारखानदार प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवतात. मी जवळपास ५०० ते ६०० मूर्ती शाडू मातीच्या बनवितो असे कारखानदार वसंत पोेळेकर यांनी सांगितले. तळे तालुक्यात जवळपास ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल या कारखान्यांमुळे होते.