बांगलादेशी घुसखोर घरातच चालवित हाेते देहविक्रयाचे रॅकेट! तिघांना अटक, अल्पवयीन मुलीची सुटका

By कमलाकर कांबळे | Published: February 17, 2024 09:19 PM2024-02-17T21:19:14+5:302024-02-17T21:19:55+5:30

विशेष म्हणजे अटक केलेल्यापैकी दोन आरोपी हे बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bangladeshi intruders were running a prostitution racket in the house Three arrested, minor girl released | बांगलादेशी घुसखोर घरातच चालवित हाेते देहविक्रयाचे रॅकेट! तिघांना अटक, अल्पवयीन मुलीची सुटका

प्रतिकात्मक फोटो...

नवी मुंबई : तळोजा येथील एका भाडेतत्त्वावरील घरात अल्पवयीन मुलींना देहविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रय करण्यासाठी घरात डांबून ठेवलेल्या एका पंधरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्यापैकी दोन आरोपी हे बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तळोजा फेज १ मधील एव्हर शाईन सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये देहविक्रय करण्यासाठी अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार घोरपडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने बनावट ग्राहक पाठवून प्राप्त माहितीची खातरजमा करून घेतली. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकून मोहिनूर इस्माईल मंडल ( ३५), मोहिनी ऊर्फ डॉली मोहिनूर मंडळ (२७) आणि समोन धातून शेख (२५) या तिघांना ताब्यात घेतले. तसेच, या ठिकाणी देहविक्रय करण्यासाठी डांबून ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका केली. मोहिनूर इस्माईल मंडल हा मूळचा कोलकाता तर उर्वरित मोहिनी ऊर्फ डॉली मोहिनूर मंडळ) आणि समोन धातून शेख हे बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

आरोपींच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १९५६ कलम ३, ४, ५ सह पोस्कोसह भारतीय पासपोर्ट अधिनियम कलम ३ (अ), ६ (अ) सह विदेशी नागरिक अधिनियमातील कलम १४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Bangladeshi intruders were running a prostitution racket in the house Three arrested, minor girl released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.