आगरी-कोळी भवन समस्यांच्या विळख्यात; सिडकोचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:23 AM2020-02-06T00:23:14+5:302020-02-06T00:23:34+5:30

प्रशस्त मजला वापराविना धूळखात; स्वच्छतेचा अभाव

Awareness of Agri-Koli Building Problems; Ignoring Cidco | आगरी-कोळी भवन समस्यांच्या विळख्यात; सिडकोचे दुर्लक्ष

आगरी-कोळी भवन समस्यांच्या विळख्यात; सिडकोचे दुर्लक्ष

Next

- अनंत पाटील

नवी मुंबई : शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी बांधवाच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून पामबीच मार्गावर नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात आले आहे; परंतु नियमित देखभालीअभावी या भवनची दुरवस्था झाली आहे. समस्यांचा विळखा पडला आहे. या वस्तूचा एक प्रशस्त मजला वापराविना धूळखात पडला आहे. या परिस्थितीकडे सिडकोच्या संबंधित विभागाने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने स्थानिक आगरी-कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई आणि पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापूर आणि खारघर ते पनवेल परिसरात आगरी-कोळी समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. नवी मुंबईचे स्थानिक रहिवासी असलेल्या या भूमिपुत्रांच्या शेतजमिनीवर नवी मुंबई शहर वसले आहे. शहरीकरणामुळे येथील मूळ संस्कृती लोप पावली आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने नऊ वर्षांपूर्वी नेरुळ येथे आगरी-कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या भवनचे शानदार उद्घाटन करण्यात आले.

या भवनमुळे आगरी-कोळी समाजाची मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहील, हा यामागचा उद्दात हेतू होता. भवनची वास्तू सुबक व आकर्षक असली तरी तिच्या नियमित देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रशस्त वास्तूमध्ये तळमजल्यावर वाहनतळ तसेच लग्नसमारंभासाठी जेवणाची व्यवस्था व कार्यालय आहे. मात्र, येथील स्वच्छतागृह आणि सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे.

बेसीनमधील नळाला पाणीच नाही, शौचालयातील नळ गायब आहेत. तर भिंतीच्या लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयाची भांडी फुटलेली आहेत. दरवाजाची कडीकोयंडा तुटल्यामुळे अक्षरश: दरवाजा दोरीने बांधण्याची वेळ येथील व्यवस्थापनावर आलेली आहे.
आगरी-कोळी भवनमध्ये लग्नसोहळ्यासह विविध कार्यक्रम होतात. मंगळवारी या ठिकाणी एक लग्नसोहळा होता. येथील गैरसोयींचा वाईट अनुभव आला. त्यानुसार वधूवरांच्या वºहाडी मंडळीने सदर बाब तेथील कार्यालयीन सहायक आर. पी. तवले यांच्या निदर्शनास आणून दिली असता यासंदर्भात सिडकोच्या संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

भवनच्या तिसऱ्या मजल्यावर ५०० आसन क्षमता असलेले सभागृह तर दुसºया मजल्यावर लग्न कार्यालय आहे. या इमारतीचा पहिला मजला हा खास आगरी-कोळी संस्कृती जपण्यासाठी ठेवण्यात आला. येथे या समाजाची वापरात आलेली हत्यारे, शेतीसाठीची अवजारे, मासेमारीसाठी लागणारी जाळी, शेती व वापराच्या विविध वस्तू यांचे संग्रहालय तसेच आगरी-कोळी साहित्यासाठी ग्रंथालय नियोजित करण्यात आले होते; परंतु नऊ वर्षे उलटली तरी यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता झाली नसल्याचे दिसून आले आहे.

आगरी कोळी भवनच्या तळमजल्यावरील दुरुस्ती विषयी त्वरित पाहणी करून तसा अहवाल संबंधित विभागाला पाठविण्यात येईल. तसेच भवनमध्ये आगरी-कोळी समाजाची रूढी-परंपरा सास्कृतिक ओळख असलेली अवजारे आणि विविध वस्तू संग्रहालय उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
- मंगलसिंग महाले, कार्यकारी अभियंता,सिडको

Web Title: Awareness of Agri-Koli Building Problems; Ignoring Cidco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.