सरकारला 16 ऑगस्टची मुदत; विमानतळ नामकरणासाठी एल्गार, काम बंद पाडण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:59 AM2021-06-25T06:59:07+5:302021-06-25T06:59:12+5:30

चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र उतरले रस्त्यावर : काम बंद पाडण्याचा इशारा

August 16 deadline for government; Elgar for navi mumbai airport naming pdc | सरकारला 16 ऑगस्टची मुदत; विमानतळ नामकरणासाठी एल्गार, काम बंद पाडण्याचा इशारा

सरकारला 16 ऑगस्टची मुदत; विमानतळ नामकरणासाठी एल्गार, काम बंद पाडण्याचा इशारा

Next

नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी चार जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र गुरुवारी रस्त्यावर उतरले. नामकरणासाठी सरकारला १६ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये योग्य निर्णय न घेतल्यास विमानतळाचे बांधकाम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सायन - पनवेल महामार्ग सात तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र सहभागी झाले होते. पहाटेपासूनच भूमिपुत्र नवी मुंबईमध्ये एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. यामुळे पोलिसांनी सकाळी आठपासून सायन - पनवेल महामार्ग व सिडको भवनकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले होते. आंदोलकांना पामबीच रोडवर नवी मुंबई महापालिकेच्या जवळ एकत्र येऊन तेथेच शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पामबीच रोडवर जवळपास दोन किलाेमीटर अंतरावर आंदोलकांच्या रांगा लागल्या होत्या. भूमिपुत्रांच्या त्यागावर नवी मुंबई उभी राहिली असून, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी आंदोलकांनी केली. विमानतळाच्या ठिकाणची कामे बंद पाडली जातील व आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा सरकारला देण्यात आला.

सायन - पनवेल महामार्ग सात तास बंद

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सायन - पनवेल महामार्ग सकाळी आठ वाजता बंद करण्यात आला होता. दुपारी सव्वातीन वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सात तास महामार्ग  बंद होता. या दरम्यान वाहतूक शिळफाटा मार्गे वळविण्यात आली होती. शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने मुुंबईतून पनवेलला जाण्यासाठी व पनवेलवरून मुंबईत पोहोचण्यासाठी तीन ते साडेतीन तास वेळ लागत होता.

मागणीचे निवेदन दिले : शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले. आंदोलनात माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, राजू पाटील, महेश बालदी, प्रशांत ठाकूर, हुसेन दलवाई, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक व कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होेते.

आंदोलनातील महत्त्वाचे मुद्दे 

  • सायन - पनवेल महामार्गासह सिडको 
  • भवनकडे जाणारे सर्व रस्ते सात तास बंद.
  • बंदोबस्तासाठी सात हजार अधिकारी, कर्मचारी तैनात केले होते.
  • मुुंबईतून पुणेकडे व पुणेकडून मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक शिळफाटा मार्गे वळविण्यात आली होती.
  • वाहतुकीतील बदलामुळे शिळफाटा, वाशी टोलनाका, कळंबोलीत वाहतूक कोंडी.
  • महिलांनी आंदोलनस्थळीच वटपौर्णिमा साजरी केली.
  • वारकरी मंडळींनी भजन म्हणत 
  • आंदोलनात सहभाग घेतला.
  • आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारे गीत व नृत्य सादर करण्यात आली.
  • पामबीच रोडवर दोन किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: August 16 deadline for government; Elgar for navi mumbai airport naming pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.