नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न साकारल्यानंतर सिडकोने आता या परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ‘अटल सेतू’ला थेट विमानतळ, जेएनपीए आणि पुढे अलिबागला जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून उलवे कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला असून, त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची नुकतीच प्रक्रिया सुरू केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई-अलिबाग हा प्रवास केवळ दीड तासांत होणार आहे. मार्गाच्या विस्तारामुळे अटल सेतूपासून द्रोणागिरीमार्गे करंजा-रेवस पुलापर्यंत अखंड कोस्टल कॉरिडॉर उभा राहणार असून, नवी मुंबई, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकण यांच्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. परिणामी, वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा ७ कि.मी. लांबीचा सहा-लेन उलवे कोस्टल रोड उभारला जात आहे.
या मार्गाचा पुढील टप्पा म्हणून द्रोणागिरीमार्गे करंजा खाडी पुलापर्यंत विस्तार करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यासाठी तांत्रिक अभ्यास, पर्यावरणीय परिणामांचा आढावा आणि खर्चाचा अंदाज तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची निविदाप्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खारफुटीचे जंगल वाचविण्यासाठी एलिव्हेटेडचा विचार
प्रस्तावित विस्तार मोठ्या प्रमाणावर एलिव्हेटेड (उंचावरील) स्वरूपात उभारण्याची शक्यता आहे. खारफुटी क्षेत्राला बाधा होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी स्टिल्ट्सवर रस्ता उभारण्याचा पर्याय विचारात आहे. सहा-लेन किंवा त्याहून अधिक क्षमतेचा हा सिग्नल-फ्री मार्ग अटल सेतू, विमानतळ, द्रोणागिरी आणि पुढे रेवस-करंजा पूल अशी अखंड जोडणी निर्माण करील.
विस्तारानंतर खर्च किती?
सध्याच्या उलवे कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च १,६०० कोटी रुपये आहे. त्याच धर्तीवर विस्ताराचा अंदाजे खर्च २,५०० ते ४,००० कोटी रुपयांदरम्यान जाऊ शकतो. मात्र, अंतिम आकडे सविस्तर प्रकल्प अहवालानंतरच स्पष्ट होणार आहेत.
वाहतुकीला कसा दिलासा?
अटल सेतूपासून विमानतळ व द्रोणागिरीपर्यंत सिग्नल-फ्री प्रवासपाम बीच रोडसह मुख्य मार्गांवरील वाहतूक ताण कमीप्रवासाचा वेळ २०-३० मिनिटांनी घटणारजेएनपीए कंटेनर ट्रॅफिक शहराबाहेर वळवणे शक्य
रेवस जोडणीचे फायदे
कोस्टल रोडला रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडल्यास नवी मुंबई-अलिबाग-कोकण थेट रस्त्याने जोडले जाईल. फेरी बोटीवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल, तसेच जेएनपीए व द्रोणागिरी क्षेत्रासाठी लॉजिस्टिक्स अधिक सुलभ होईल.
किती वेळेची बचत होणार?
मुंबईतून सायन-पनवेलमार्गे गोवा महामार्गावरून प्रवास केल्यास ९० किमी अंतर पार करावे लागते. यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. परंतु अटल सेतू उलवे कोस्टल रोड आणि रेवस-करंजा पुलाच्या निर्मितीनंतर हे अंतर ५५ ते ६० किमी होईल.
Web Summary : Atal Setu will soon connect directly to Alibaug via the Ulwe Coastal Road extension. This reduces Mumbai-Alibaug travel to 90 minutes. The project includes a bridge over the Revdanda creek, enhancing connectivity between Mumbai, Navi Mumbai Airport, and Konkan, promising faster, smoother traffic flow.
Web Summary : अटल सेतु जल्द ही उलवे कोस्टल रोड विस्तार के माध्यम से सीधे अलीबाग से जुड़ेगा। इससे मुंबई-अलीबाग की यात्रा 90 मिनट तक कम हो जाएगी। परियोजना में रेवदंडा क्रीक पर एक पुल शामिल है, जो मुंबई, नवी मुंबई हवाई अड्डे और कोंकण के बीच कनेक्टिविटी को बढ़ाता है, जिससे तेज और सुगम यातायात प्रवाह का वादा किया गया है।