अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सला मिळाले बळ; राज्यातील पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 07:38 IST2025-09-26T07:38:14+5:302025-09-26T07:38:50+5:30
उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे.

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सला मिळाले बळ; राज्यातील पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन
नवी मुंबई : राज्याला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे पहिले कार्यालय नवी मुंबईत सुरू झाले आहे. कोकण विभागासाठी सानपाडा पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली असून त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. मुंबई वगळता संपूर्ण कोकण परिक्षेत्रातील अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट मोडीत काढण्यासाठी हे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.
देशाला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक राज्यांमध्ये टास्क फोर्स तयार करण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये त्यास मंजुरी मिळताच जून महिन्यात या टास्क फोर्सची जबाबदारी विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत यांच्यावर सोपवण्यात आली.
त्यानंतर तयार करण्यात आलेल्या कोकण विभागाच्या टास्क फोर्सला जागेची कमी भासत होती. त्यांच्यासाठी सानपाडा येथे नव्याने उभारलेल्या पोलिस ठाण्याच्या इमारतीमध्ये जागा देण्यात आली आहे. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, अतिरिक्त अप्पर पोलिस अधीक्षक गणेश इंगळे आदींच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
तीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा
उप अधीक्षक रामचंद्र मोहिते यांच्यावर कोकण परिक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबई वगळता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. यासाठी जवळपास तीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा त्यांना देण्यात आला आहे. मात्र कार्यक्षेत्र पाहता भविष्यात पथकाचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज भासू शकते. यापूर्वी नवी मुंबईसह ठाणे, रायगड परिसरात ड्रग्स माफियांचे मोठे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.