उद्धवसेनेचे अनिल परब, ज. मो. अभ्यंकर, काँग्रेसचे रमेश किर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
By कमलाकर कांबळे | Updated: June 3, 2024 20:11 IST2024-06-03T20:08:27+5:302024-06-03T20:11:26+5:30
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती

उद्धवसेनेचे अनिल परब, ज. मो. अभ्यंकर, काँग्रेसचे रमेश किर यांचे उमेदवारी अर्ज दाखल
कमलाकर कांबळे -
नवी मुंबई : महाविकास आघाडीकडून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी उद्धवसेनेचे आमदार ॲड. अनिल परब आणि मुुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ज. मो. अभ्यंकर यांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे रमेश किर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून रोहन साठाेणे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत चार उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली.
विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर या चार जागांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे. ३१ मे २०२४ रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यानुसार ७ जून दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची मुदत आहे. त्याअनुषंगाने सोमवारी उद्धवसेनेचे अनिल परब आणि जे. एम. अभ्यंकर यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले.
याप्रसंगी उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार विलास पोतनीस, संजय पोतनीस, काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्धवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
या मतदारसंघात उद्धवसेनेने चांगली नोंदणी केली आहे. त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल. पुढे कोण उमेदवार आहे, याचा काहीही फरक पडत नाही. विजय आमचाच असल्याचा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे रमेश किर यांनीसुद्धा जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज सादर केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, आबा दळवी, राजेश शर्मा, सुदाम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.