पत्नीची हत्या करून पती पोलिस ठाण्यात; सीबीडीतली घटना, सततच्या अपमानाला कंटाळून उचलले पाऊल
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 3, 2023 18:35 IST2023-04-03T18:35:17+5:302023-04-03T18:35:42+5:30
पत्नीकडून सतत होणाऱ्या अपमानाला कंटाळून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे.

पत्नीची हत्या करून पती पोलिस ठाण्यात; सीबीडीतली घटना, सततच्या अपमानाला कंटाळून उचलले पाऊल
नवी मुंबई : पत्नीकडून सतत होणाऱ्या अपमानाला कंटाळून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सोमवारी पतीला अटक केली आहे.
जसपालसिंग मसुता (३६) असे पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तो सेक्टर ४ येथे पत्नी रजविंदकौर यांच्यासह रहायला होता. त्यांना पाच वर्षाची मुलगी देखील आहे. जसपालसिंग हा कतार येथे चालकाची नोकरी करायचा. मात्र जानेवारीत तो भारतात आल्यानंतर सीबीडी येथील घरीच राहत होता. यादरम्यान पती पत्नीत सातत्याने भांडण होत होते. त्यातून पत्नी त्याचा अपमान करायची असे त्याचे म्हणणे आहे.
रविवारी रात्री त्यांची मुलगी मैत्रिणीच्या जन्मदिनासाठी मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी जसपालसिंग हा घरी आला असता पत्नी झोपलेली होती. यावेळी त्याने पत्नीला उठवून काम करण्यास सांगितले असता दोघात पुन्हा भांडण झाले. त्यामुळे संतप्त जसपालसिंग याने घरातील चाकूने पत्नी रजविंदरकौर हिच्या गळ्यावर वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. त्यांनतर सीबीडी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह ताब्यात घेऊन जसपालसिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत त्याने पत्नीसोबतचे सतत होणारे भांडण व तिच्याकडून होणारा अपमान याला कंटाळून पत्नीची हत्या केल्याची कबुली पतीने दिली असल्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले. या घटनेमुळे सीबीडी परिसरात खळबळ उडाली आहे.