सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईमद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. सहा महिन्यांत ७२१ मद्यपींवर कारवाई झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर ठोस कारवाईच्या उद्देशाने त्यांचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी तीव्र केली आहे. शहरात रस्त्यांवर, चौकात नाकाबंदी करून या कारवाया होत आहेत. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गतवर्षी एकूण ११०४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली होती. त्यांच्याकडून दंड स्वरूपात १० लाख २१ हजार रुपये जमा झालेले होते. तर २०१५ या चालू वर्षात जून अखेरपर्यंत ७२१ जणांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ६८ हजार रुपयांची दंडाची रक्कम जमा झालेली आहे. ही संख्या गतवर्षीच्या जून अखेरपर्यंतच्या कारवाईच्या दुप्पट आहे. परंतु कारवाया करूनही अशा प्रकारांना आळा बसलेला नाही. वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या ठिकाणांत पामबीच मार्गाचाही समावेश आहे. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे पामबीच मार्ग जीवघेणा ठरत आहे. मद्यपान करून वाहने चालवली जात असल्याने अपघातांचे प्रमाण मोठे आहे. अशा अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परंतु अनेकांवर एकापेक्षा जास्त वेळा कारवाया होवूनही त्यांच्यावर वचक बसलेला नाही. वाहतूक पोलीस चलन फाडताच न्यायालयात एक हजार रुपये दंड भरल्यानंतर पुन्हा मोकळे, असा मद्यपी वाहन चालकांचा समज झाला आहे. त्यामुळे एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई झाल्यानंतरही पुढच्या कारवाईला ते तयार असतात. याचा मनस्ताप वाहतूक पोलिसांना होत आहे. कायद्याची भीती निर्माण व्हावी यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कडक कारवाईची गरज असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
मद्यपींचा परवाना होणार रद्द
By admin | Updated: August 7, 2015 23:31 IST