Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:06 IST2025-06-18T09:05:31+5:302025-06-18T09:06:08+5:30
हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी साश्रुनयनांनी एअर होस्टेस मैथिली पाटील हिला अखेरचा निरोप देण्यात आला.

Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
उरण: कुटुंबीयांचे काळीज पिळवटून टाकणारे हुंदके, हंबरडे, आक्रोश आणि हळहळ व्यक्त करून हजारोंच्या उपस्थितीत मंगळवारी साश्रुनयनांनी एअर होस्टेस मैथिली पाटील हिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या पार्थिवावर न्हावा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
१२ जूनला दुपारी अहमदाबादहून लंडनकरिता उड्डाण केलेल्या विमानाला अपघात झाला. त्यात न्हावा गावातील २३ वर्षीय मैथिली कार्यरत होती. तिने बुधवार, ११ जूनला कुटुंबासोबत वेळ घालविला होता. गुरुवार, १२ जूनला ती सकाळीच उड्डाणासाठी लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात ड्युटीकरिता कुटुंबीयांचा निरोप घेऊन निघाली होती. विमानात चढण्यापूर्वी तिने सकाळी ११.३० सुमारास कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला होता. मात्र, काही वेळाने विमानाला अपघात झाल्याचे कुटुंबीयांना समजले. तिचा मृत्यू झाल्याच्या बातमीवर मात्र कुटुंबीय विश्वास ठेवण्यास कोणत्याही प्रकारे तयार नव्हते.
अपघाताची बातमी येताच मैथिलीची आई, मामा आणि एक-दोन नातेवाइकांनी गुरुवारीच थेट अहमदाबाद गाठले. तेथील विविध रुग्णालयांमध्ये, तर अपघाताहून अधिक भयानक दृश्य दिसत होते. अनेक नातेवाईक आपल्या मृत्युमुखी पडलेल्या माणसांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये जागा मिळेल तिथे वाट पाहत बसून होते. नातेवाइकांना ओळखण्यासाठी डीएनए चाचणी केली जात होती. चाचणीचे निष्कर्ष येण्यासाठी ७२ तासांचा वेळ लागत होता. मात्र, ७२ तासांची प्रतीक्षा म्हणजे एकप्रकारे दिव्यच होते, असे कुटुंबीयांनी सांगितले.
पोलीस, नेत्यांची उपस्थिती
१६ जूनला सायंकाळी ५.३० वाजता मैथिलीचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर विमानाने मुंबई गाठल्यानंतर मंगळवारी सकाळी १०.३०च्या सुमारास न्हावा येथील घरी आणला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मैथिलीचा मृतदेह घरी आणताच कुटुंबीयांचा अश्रूचा बांध फुटला आणि भावनांना वाट करून दिली. पोलिस, प्रशासन अधिकारी, नेते व नागरिकांच्या उपस्थितीत मैथिलीच्या पार्थिवावर न्हावा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.