एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 07:38 IST2025-08-14T07:38:19+5:302025-08-14T07:38:26+5:30

ओआरएटी प्रक्रियेला लागणार उशीर

Aerodrome license halts flights in Navi Mumbai | एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?

एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?

नवी मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सप्टेंबरमध्ये शुभारंभ करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार कामाला गती मिळाली आहे. असे असले, तरी विमानतळ परिचालनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा ऐरोड्रोम परवाना अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सप्टेंबरचा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एखाद्या विमानतळावर प्रवासी किंवा मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची परवानगी अत्यावश्यक असते. एरोड्रोम परवाना हा धावपट्टीची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना, पायाभूत सुविधा, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम, अग्निशमन व्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, कस्टम्स व इमिग्रेशन तसेच पर्यावरणीय मानकांसाठी अधिकृत प्रमाणपत्र असते. नवी मुंबई विमानतळासाठी तो ऑगस्टच्या अखेरीस मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हा परवाना प्राप्त झाल्यानंतर 'ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रायल्स' (ओआरएटी) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ४ ते ६ आठवड्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे प्रत्यक्षात विमानतळाचे उद्घाटन ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्येच होईल, अशी शक्यता विश्वासनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पहिला अर्ज नाकारला

विमानतळाचे परिचलनाची जबाबदारी असलेल्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लि. ने एरोड्रोम परवान्यासाठी सर्वप्रथम डिसेंबर २०२४ मध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे अर्ज केला होता. मात्र, तांत्रिक स्वरूपाच्या काही किरकोळ त्रुटींमुळे हा अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर आवश्यक सुधारणांसह पुन्हा मार्च २०२५ मध्ये अर्ज केला. विमान वाहतूक महासंचालनालयाने जुलैमध्ये विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे ऑगस्टअखेरपर्यंत हा परवाना प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तारीख पे तारीख 

विमानतळाच्या उ‌द्घाटनासाठी सिडको आणि राज्य सरकारने जानेवारी २०२५ चा मुहूर्त जाहीर केला होता. त्यानंतर अदानी समूहाने उद्घाटनासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंत डेडलाइन दिली. मात्र, हा मुहूर्तही हुकल्याने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबरमध्ये उड्डाण होईल, अशी घोषणा केली होती.
 

Web Title: Aerodrome license halts flights in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.