तीन दिवसांत ३३५७ होर्डिंग्जवर कारवाई
By Admin | Updated: October 10, 2016 03:33 IST2016-10-10T03:33:40+5:302016-10-10T03:33:40+5:30
पनवेल शहर महानगरपालिकेची स्थापना नुकतीच झाली आहे. महापालिकेचे प्रथम आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी पदभार सांभाळला आहे

तीन दिवसांत ३३५७ होर्डिंग्जवर कारवाई
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची स्थापना नुकतीच झाली आहे. महापालिकेचे प्रथम आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी पदभार सांभाळला आहे. पालिकेला स्वच्छ, सुंदर, स्मार्ट बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरु वात केली आहे. शहरात तीन दिवसांत तब्बल ३ हजार ३५७ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरू आहे. उत्सवाच्या औचित्याने सर्वच राजकीय पक्षांनी बॅनरबाजीवर भर दिला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन इच्छुकांनी मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी, बाजारपेठ परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अनेक कोचिंग क्लासेस, स्वयंसेवी संघटना देखील यामध्ये जाहिरातबाजीत मागे नाहीत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारत आयुक्त शिंदे यांनी सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हजारोपेक्षा जास्त असून यावर कारवाई होत नाही. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत होते, शिवाय शहराचे विद्रूपीकरण होते. हे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याबाबत पनवेल शहर महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुधाकर शिंदे सूत्रेहाती घेतल्यावर प्रथम या होर्डिंग्जला लक्ष्य केले आहे. पालिकेने तीन दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या ६ गाड्या व १० कर्मचारी तसेच ६ अधिकाऱ्यांचे पथक कारवाईत सहभागी आहे. पहिल्या दिवशी १११२, दुसऱ्या दिवशी ८२३ होर्डिंग्ज काढण्यात आले तर शनिवार, ८ आॅक्टोबरला केलेल्या कारवाईत ९९६ होर्र्डिंग्ज काढण्यात आले. यामध्ये १ फूटपासून ४० फुटापर्यंत होर्डिंग्जचा समावेश आहे. सध्या तरी एकूण ३३५७ होर्डिंग्ज काढून झाले असून ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.