एसटी महामंडळाच्या ३४२ बसवर कारवाई, नाशिकमधील अपघातानंतर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:12 AM2020-02-01T00:12:14+5:302020-02-01T00:12:51+5:30

नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला.

Action on 342 buses of ST Corporation, Expedition after accident in Nashik | एसटी महामंडळाच्या ३४२ बसवर कारवाई, नाशिकमधील अपघातानंतर मोहीम

एसटी महामंडळाच्या ३४२ बसवर कारवाई, नाशिकमधील अपघातानंतर मोहीम

Next

- वैभव गायकर

पनवेल : एसटी महामंडळाच्या बसचालकांवर वारंवार बेशिस्तपणाने वाहन चालविण्याचे आरोप होत असतात. मात्र, सरकारी कर्मचारी असल्याने अनेकदा या वाहनचालकांना कारवाईतून झुकते माप दिले जाते. मात्र, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर २३ ते ३० जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ३४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला. तर ३५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर द्रुतगती महामार्ग पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. महामार्ग अधीक्षक विजय पाटील, पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्रचे डॉ. दिगंबर प्रधान, एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी धनाजी घाटगे, अरुण विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे केंद्राच्या मार्फत दोन्ही मार्गिकेवर ही कारवाई करण्यात आली. सरकारी यंत्रणेवरील वाहन असल्याने एसटी महामंडळाचे चालक सर्रास वाहतूक नियमांना बगल देत वाहतुकीचे नियम यायदळी तुडवत असतात, त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो.
कारवाईमध्ये एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही, विठाई, हिरकणी आदीसह इतर राज्य महामंडळाच्या बसचा समावेश आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहनचालकांवर ई-चलन मशिनद्वारे कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी पोलीस निरीक्षक सुदाम पातोरडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, महाराष्ट्र राज्य दिनेश कदम, विनायक यादव, डी. पी. आंडील, मुंबई विभागाचे सहायक वाहतूक निरीक्षक पी. जी. माने उपस्थित होते.

एसटी महामंडळाकडून गंभीर दखल
कारवाई संदर्भात एसटी महामंडळस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपव्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.

दंडाची रक्कम चालकांच्या वेतनातून वसुली?
एसटी महामंडळाच्या ३४२ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हा दंड संबंधित चालकांच्या वेतनातून वसूल केला जाण्याची शक्यता आहे.

एसटी बसद्वारे मोठ्या प्रमाणात प्रवासीवाहतूक होत असते. अतिवेगाने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होतो. याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.
- सुभाष पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक, पळस्पे केंद्र द्रुतगती महामार्ग

Web Title: Action on 342 buses of ST Corporation, Expedition after accident in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.