पत्नीची हत्या करून ३३ वर्षे 'तो' होता फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:47 IST2024-12-25T11:47:11+5:302024-12-25T11:47:21+5:30
आरोपीचा मोबाइल नंबर मिळाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली.

पत्नीची हत्या करून ३३ वर्षे 'तो' होता फरार
नवीन पनवेल : किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हापासून फरार असलेला आरोपी पतीला ३३ वर्षांनंतर पनवेल शहर पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे.
बाबू गुडगीराम काळे (वय ७०) असे आरोपीचे नाव आहे. २८ जानेवारी १९९१ रोजी आरोपीचे पत्नीबरोबर भांडण झाले. रागापोटी त्याने अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. भाजलेल्या अवस्थेत पत्नीला सायन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान मृत्यू
तिने दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपी घटनेनंतर फरार होता. ३३ वर्षांनंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे.
असा लागला शोध
आरोपी विरोधात दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. प्रथम वर्ग न्यायालयाचे अटक वॉरंट प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपीची माहिती प्राप्त केली. यावेळी आरोपी हा मुलुंड येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
पोलिसांनी मुलुंड येथे तपास केला असता आरोपी हा सेतू, जिल्हा परभणी येथे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार व पोलिसांचे पथक पाठवून तपास शोध घेतला.
आरोपीचा मोबाइल नंबर मिळाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली. न्यायालयात हजर केले असता तीन जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.