सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 00:32 IST2019-10-26T00:31:42+5:302019-10-26T00:32:17+5:30
शिरवणेमधील प्रकार; खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा

सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर शिरवणे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे चालकांचा गाडीवरून ताबा सुटून अपघात होत आहे. वारंवार वाहतूककोंडीही होत असून या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवासी वाहतूकदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
महामार्गावरील वाहतूककोंडी थांबविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी शासनाने महामार्गाचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अनेक ठिकाणी कामे पूर्ण केली नसल्यामुळे व काही ठिकाणी निकृष्ठ काम झाल्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होऊ लागली आहे.
अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांमध्ये शिरवणेमधील पुलाच्या बाजूच्या मार्गिकेचा समावेश आहे. वाशीच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जवळपास एक फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे आहेत.
खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. मोटारसायकलचा वारंवार अपघात होत आहे. खड्ड्यामध्ये आदळून मोटारसायकलस्वार खड्ड्यात कोसळू लागले आहेत. कार व इतर वाहनांचेही खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे. सकाळी व सायंकाळी रोडवर वाहतूककोंडी होऊ लागली आहे. रोजच हा त्रास होत असल्यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
शिवसेनेचे इंदिरानगरमधील विभागप्रमुख महेश कोठीवाले यांनी याविषयी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या ठिकाणी खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे काँक्रीटचा रोड करावा. कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. येथे अपघात झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.