एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

By कमलाकर कांबळे | Updated: June 25, 2025 05:36 IST2025-06-25T05:35:53+5:302025-06-25T05:36:41+5:30

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.  

ACB report shakes CIDCO administration, questions mark on functioning of personnel department | एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
सिडकोमधील कथित लाचखोरी प्रकरणात नरेंद्र हिरे याला अटक झाल्यानंतर ठाणे एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना अहवाल सादर केला आहे. यात  कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.  यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

या प्रकरणात  कार्मिक विभागाने केलेल्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यात सिडकोच्या वरिष्ठ विकास अधिकाऱ्यांना डावलून महत्त्वाच्या विभागात प्रभारी म्हणून इतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्याच्या तक्रारी होत्या.

भूखंड विभागातही गोंधळ

साडेबावीस टक्के भूखंड विभागातसुद्धा अशाच प्रकारे सावळागोंधळ सुरू आहे. या विभागाचा प्रभारी पदभार असलेल्या एका अधिकाऱ्याने संपूर्ण विभागाला वेठीस धरल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रारी करूनही दक्षता विभाग मूग गिळून गप्प असल्याचे सांगितले जात आहे. 

दक्षता विभागही कचाट्यात

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी झाल्या होत्या.  
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, सध्या सुरू असलेली नोकरभरती तसेच विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्ती आदींबाबत या विभागावर  गंभीर स्वरुपाचे आरोप केले गेले. 

भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्थापन झालेल्या दक्षता विभागाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची नियमानुसार चौकशी करून कारवाई केली जाते. कथित  बदल्या आणि अर्थिक घोटाळ्यांबाबत चौकशी सुरू आहे. तसेच लाच प्रकरणी एसीबीचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला आहे. त्यात नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. -राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको

 

Web Title: ACB report shakes CIDCO administration, questions mark on functioning of personnel department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.