शिकवणीवर स्लॅब कोसळून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कोपरखैरणेतील दुर्घटना; शिक्षिकेसह १२ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:37 IST2026-03-06T05:37:09+5:302026-03-06T05:37:23+5:30
दुर्घटनाग्रस्त इमारत २८ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात खासगी शिकवणी सुरू असताना या तीनमजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला.

शिकवणीवर स्लॅब कोसळून सातवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; कोपरखैरणेतील दुर्घटना; शिक्षिकेसह १२ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्याभवन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळून खासगी शिकवणीतील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अन्य ११ विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.या दुर्घटनेत मत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव मनीष म्हसे आहे. तो सातवीत शिकत होता. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारही दिला आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत २८ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात खासगी शिकवणी सुरू असताना या तीनमजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. त्यामुळे तळमजल्यावरील शिकवणीतील १२ विद्यार्थी आणि १ शिक्षिका ढिगाऱ्यात अडकले होते. नागरिकांनी पोलिसांसह अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती दिली. महापालिकेचे विभाग अधिकारी भरत धांडे तसेच कोपरखैरणे आणि वाशी येथील अग्निशमन केंद्रातील बंबांनी बचावकार्याला सुरुवात केली.
महापौर, आयुक्त दुर्घटनास्थळी
अपघाताचे वृत्त कळताच महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयांना भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची व शिक्षिकेची विचारपूस केली.
मदतकार्यात अडथळे
कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्यामुळे दुर्घटनाग्रस्त घरात जाण्याचा मार्ग बंद झाला होता. परिणामी अडकलेल्यांची सुटका करण्यात अडथळे येत होते. अखेर खिडकी तोडून ढिगाऱ्याखालील विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. जखमींना वाशीतील पालिका रुग्णालय आणि जवळपासच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लायन्स क्लब रुग्णालयात ३ तर एपेक्स रुग्णालयात ५ व पालिका रुग्णालयात एका विद्यार्थ्यावर उपचार सुरू असल्याचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितले.
----
याच इमारतीत पूर्वीही दुर्घटना
विद्या भवन इमारतीमध्ये यापूर्वीही स्लॅब कोसळला होता. त्यानंतरही इमारतीचा वापर सुरू आहे, असे सामाजिक कार्यकर्ते दीपक बदक यांनी सांगितले.
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पडझड झालेल्या घरातील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
डॅा. कैलास शिंदे, नवी मुंबई महापालिका
जखमी विद्यार्थी :
सिद्धांत गुप्ता (वय ८)
प्रिन्स सोनी (११)
आयशा खान (११)
कुलसुम खान (१३)
निष्का धनावडे (१३)
आराध्या बोरसे (१३)
तन्वी श्रीवास्तव (७)
देवांश पुजारी (१२)
राजदीप वानखडे (१०)
पार्थ खैरनार (१३)
रुद्र पाटील (५)
श्यामली चौधरी(५३, शिक्षिका)