बँक ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड; दौंडमध्ये घेतले होते भाड्याने घर

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 22, 2024 06:41 PM2024-03-22T18:41:03+5:302024-03-22T18:41:32+5:30

मोटारसायकलवरून कल्याण मार्गे नवी मुंबई व ठाणेत येऊन बँकांमधून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून संधी मिळताच त्यांची रोकड पळवायचे.

A gang busted robbing bank customers; A house was taken on rent in Daund | बँक ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड; दौंडमध्ये घेतले होते भाड्याने घर

बँक ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीचा भांडाफोड; दौंडमध्ये घेतले होते भाड्याने घर

नवी मुंबई : नवी मुंबईसह ठाणे परिसरात बँकेत पाळत ठेवून रोकड घेऊन जाणाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीच्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी केलेले आठ गुन्हे उघड झाले असून टोळीवर यापूर्वीही १७ गुन्हे दाखल आहेत. दौंड येथे भाड्याने घर घेऊन ते सहा वर्षांपासून राहत होते.

बँकेतून रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांची रोकड लुटण्याच्या घटना शहरात घडत होत्या. रस्त्यालगत गाडी लावताच काचा फोडून किंवा झटका देऊन पैशाच्या बॅग पळवल्या जात होत्या. मात्र यामागे नेमक्या कोणत्या टोळीचा हात आहे याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी यांनी पथक केले होते.

त्यामध्ये सहायक निरीक्षक संतोष चव्हाण, अनिल देवळे, आकाश पाटील, सुशील मोरे, प्रकाश मोरे, वैभव पाटील, सुधीर पाटील, सचिन घनवटे आदींचा समावेश होता. त्यांनी घडलेल्या अनेक गुन्ह्यांच्या विश्लेषणातून संशयित दुचाकीची माहिती मिळवली होती. मात्र कल्याण नंतर पुढे ती कुठे जाते याचा उलगडा होत नव्हता. त्यानंतरही कौशल्याचा वापर करून पोलिसांनी संशयितांच्या दौंड येथील राहण्याच्या ठिकाणाची माहिती मिळवून त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व एकजण पोलिसांना मिळून आला. तर त्याचे सहकारी अगोदरच तिथून निघून गेल्याने ते मिळून आले नाहीत. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताच अटक करण्यात आली आहे. 

प्रवीण राजू गोगुला (२३) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा आंध्रप्रदेश मधील करालातीप्पा गावचा असून त्याचे इतर सहकारीही त्याच परिसरातले आहेत. त्यांनी दौंड येथे सहा महिन्यांपूर्वी घर भाड्याने घेतले होते. मोटारसायकलवरून कल्याण मार्गे नवी मुंबई व ठाणेत येऊन बँकांमधून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवून संधी मिळताच त्यांची रोकड पळवायचे. यासाठी त्यांचा एक सहकारी बँकेत थांबून कोणत्या व्यक्तीने अधिक रोकड काढली आहे यावर नजर ठेवून बाहेर थांबलेल्या सहकाऱ्यांना त्याची माहिती द्यायचा. त्यांनी नवी मुंबई, ठाणे, शिर्डी, फलटण येथेही गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. यावेळी सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे, वरिष्ठ निरीक्षक हनीफ मुलानी व तपास पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

"चलन" ठरले महत्वाचा "धागा"

पोलिस संशयित दुचाकीचा शोध घेत असताना, त्या दुचाकीवर दौंडमध्ये वाहतूक पोलिसांची कारवाई झाल्याचे चलन समोर आले. त्यावेळी दंड भरताना त्यांनी वापरलेल्या मोबाईल नंबरमुळे गुन्हे शाखा पोलिस त्यांच्यापर्यंत पोहचू शकले.    

कल्याणमध्ये तुटायची साखळी 

संशयित दुचाकीच्या मागावर पोलिस असताना कल्याण पासून पुढे कुठे जातेय याचा शोध लागत नव्हता. पकडले जाऊ नये यासाठी आरोपींची दौंडमध्ये घर भाड्याने घेतल्यानंतर कल्याण मागे नवी मुंबई व ठाणेत येऊन गुन्हा करून त्याच मार्गे परत दौंडला जात होते. शिवाय ते मोबाईल वापरत नसल्याने तांत्रिक तपासातही त्यांची माहिती समोर येत नव्हती. 

Web Title: A gang busted robbing bank customers; A house was taken on rent in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.