राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 06:37 IST2023-09-06T06:37:24+5:302023-09-06T06:37:54+5:30

महामुंबईतील सहा महापालिकांचा मुद्रांक उत्पन्नातील वाटा १५१.४० कोटी

420 crore lottery to 26 municipalities in the state | राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी

राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी

- नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यातील जमिनी आणि घरे व दुकानांच्या खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या मुद्रांकाच्या उत्पन्नामुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व २६ महापालिकाही मालामाल झाल्या आहेत. 

महापालिका अधिनियमात सुधारणा केल्यानंतर त्या त्या शहरातून शासनाकडून मिळणाऱ्या एकूण मुद्रांकातून एक टक्का रक्कम स्थानिक महापालिकांना देण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार, नगरविकास विभागाने राजधानी मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व २६ महापालिकांना २०२२-२३ या वर्षांतील ४२० कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता मंगळवारी वितरित केला. यात पालघरच्या वसई महापालिकेसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांना १५१ कोटी ३९ लाख ७० हजार ३०३ रुपये मिळाले आहेत. यात सर्वाधिक ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहेत.

राज्यात सर्वाधिक पुणे महापालिकेला १२९ कोटी ७३ लाख, तर त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड महापालिकेला ६१ कोटी २८ लाख रुपये आणि नाशिक महापालिकेला २१ कोटी ७० लाख आणि नागपूर महापालिकेला १९ कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. नागपूरच्या अनुदानातून १ कोटी ९१ लाख २३ हजार रुपये आयुर्विमा महामंडळाच्या कर्जाच्या हप्त्याचे कापून घेतले आहेत. नागपूरसह औरंगाबादच्या सात कोटी १४ लाख ४५ हजार ४२७ रुपयांच्या अनुदानातून एक कोटी २२ लाख ६८ हजार १०० तर वसई-विरारच्या २० कोटी ३८ लाख १५ हजार ५४ रुपये अनुदानातून २८ हजार ७०० रुपये कापून घेण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मिळालेली रक्कम 
महापालिका     मिळालेले अनुदान
ठाणे         ४४ कोटी ३४ लाख ८ हजार ३५०       
केडीएमसी          २३ कोटी ४९ लाख ९८ हजार ३८४
मीरा-भाईंदर      १९ कोटी ३५ लाख २० हजार ३८५
उल्हासनगर         एक कोटी ७५ लाख ८६ हजार ९६२
भिवंडी          दोन कोटी ८१ लाख ३० हजार २५८
नवी मुंबई         २२ कोटी तीन लाख २८ हजार ६७९
वसई          २० कोटी ३८ लाख १५ हजार ५४
एकूण         १५१ कोटी ३९ लाख ७० हजार ३०३ रुपये

Web Title: 420 crore lottery to 26 municipalities in the state