नवी मुंबई : रिक्षाचालकाकडून लाच घेताना अटक झालेल्या आरटीओचा लिपिक शैलेश पटेलच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्याच्या घरामधून २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या डॉलरसह एकूण २१ लाख ४० हजार ७०० रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या शैलेशकुमार पटेल व खाजगी एजंट बाळकृष्ण लांजेकर या दोघांना १ हजार रुपये लाच घेताना अटक केली होती. त्यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शैलेश पटेलच्या घराची शनिवारी झाडाझडती घेण्यात आली. त्याच्याकडे ९ लाख ९१ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचे घर, १०० अमेरिकन डॉलरच्या ४० नोटा असा २ लाख ४० हजार रुपये, एक स्विफ्ट कार व घरातील एकूण साहित्याची किंमत ५ लाख ५३ हजार ७०० रुपये असा एकूण २१ लाख ४० हजार ७०० रुपयांचा ऐवज सापडला आहे. लाचलुचपत विभागाने सर्व रोख रक्कम व साहित्य जप्त केले आहे. अजून बेकायदेशीर संपत्ती आहे का, याची चौकशी केली जात असून याविषयी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
लिपिकाच्या घरात २१ लाखांचे घबाड
By admin | Updated: August 8, 2015 22:14 IST