लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: रविवारी रात्रीपासूनच नवी मुंबईत पावसाचा वाढलेला जोर साेमवारी दिवसभर कायम होता. रविवार सकाळी साडेआठ वाजेपासून ते सोमवारी संध्याकाळी साडेपाचवाजेपर्यंत शहरांत १९८.८५ मिमी पाऊस कोसळला आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते, तर कोपरखैरणेतील कलश उद्यान नाल्यात एका मुलाने उडी मारल्याने तो वाहून गेला आहे. मंगळवारीही रेड ॲलर्ट जाहीर केला आहे. संततधार पावसाने एमपीएमसी मार्केटच्या बाजारपेठांसह सानपाडा सब वे, एमआयडीसीतील सखल भागात पाणी साचले होते. ठाणे-बेलापूर रस्ता, सायन-पनवेल महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
तरुणाने नाल्यात मारली उडी
निकुंज भानुशाली (३५) हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. या प्रकरणी वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती. सोमवारी तो भेटल्यानंतर वडिल त्याला घरी नेत असताना त्याने कोपरखैरणेतील ब्ल्यू डायमंड नाल्यात उडी मारली. त्याला त्वरित बाहेर काढण्यात आले. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर त्याने पुन्हा कलश उद्यान नाल्यात उडी मारली. त्याचा एनडीआरएफचे पथक शोध घेत आहेत. मुलाने अचानक उडी मारल्याने तो वाहून गेला आहे. त्याने का कशासाठी उडी मारली, हे समजू शकले नाही.
थांबलीच नाही मोनो
आचार्य अत्रे नगर स्थानकात सोमवारी मोनो गाडी न थांबताच पुढे गेल्याचा प्रकार घडला. सायंकाळी ५.२५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. चेंबूरकडून आलेली ही गाडी स्थानकावर थांबली खरी, मात्र गाडीच्या पहिल्या डब्याचा अर्धा भाग निर्धारित जागेपेक्षा काही अंतर पुढे गेला. त्यातून डब्याचा पहिला दरवाजा थेट स्थानकाबाहेर गेला. त्यामुळे मोनो गाडीचे दरवाजे न उघडताच ही गाडी पुढील स्थानकावर नेण्यात आली. याबाबत मोनो प्रशासनाकडे विचारली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.