नवी मुंबईत १५ लाखाचे अमली पदार्थ जप्त; एकास अटक
By नामदेव मोरे | Updated: July 14, 2023 19:28 IST2023-07-14T19:28:06+5:302023-07-14T19:28:14+5:30
१५१ ग्रॅम मेथाक्युलॉन पावडर जप्त

नवी मुंबईत १५ लाखाचे अमली पदार्थ जप्त; एकास अटक
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वाशीमधील सतरा प्लाझा इमारत परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरूणाला पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे १५१ ग्रॅम मेथाक्युलॉन पावडर जप्त केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळच पामबीच रोडवर असलेल्या सतरा प्लाझा इमारत परिसरात एक तरूण अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक निरज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय फुलकर व इतर कर्मचाऱ्यांनी १३ जुलैला रात्री सदर ठिकाणी सापळा रचला होता.
रात्री २ ते सव्वादोन वाजण्याच्या सुमारास एक तरूण पदपथावर संशयास्पदरित्या उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीमध्ये १५१ग्रॅम मेथाक्युलॉन पावडर आढळून आली. या अमलीपदार्थाची किम्मत १५ लाख एवढी आहे. अटक केलेल्या तरूणाचे नाव अरशद खान असे असून तो डोंबीवली परिसरात राहणारा आहे. त्याच्या विरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.