घणसोलीत आढळला दहा फूट लांबीचा अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:51 IST2018-12-01T23:51:30+5:302018-12-01T23:51:33+5:30
घणसोली गावातील शेतकरी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांबीचा अजगर शुक्रवारी सायंकाळी आढळला.

घणसोलीत आढळला दहा फूट लांबीचा अजगर
नवी मुंबई : घणसोली गावातील शेतकरी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांबीचा अजगर शुक्रवारी सायंकाळी आढळला. अजगर पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र सुरेश खरात याने पाच मिनिटांत अजगर पकडून निर्जनस्थळी सोडून दिला.
शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये दहा फूट लांब व १५ किलो वजनाचा अजगर एक महिलेला दिसला. या विषयी महिलेने इतर नागरिकांना माहिती दिली. काही वेळात परिसरातील नागरिक अजगर पाहण्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. येथील अर्जुनवाडी येथे राहणारे सर्पमित्र सुरेश खरात यांना या विषयी माहिती देण्यात आली. खरात यांनी घटनास्थळी येऊन पाच मिनिटांमध्ये शिताफीने अजगर पकडून तो पुन्हा निर्जनस्थळी नेऊन सोडला. खरात हे सर्पमित्र म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. नवी मुंबईमध्ये कुठेही साप, अजगर आढळल्यास नागरिकांसह अग्निशमन दलाचे कर्मचारीही त्याला बोलावत असतात. आतापर्यंत त्याने जवळपास तीन हजार साप पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडून दिले आहे. अजगर पकडल्यानंतर नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला व सर्पमित्र खरात यांचे आभार मानले.