सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज; मुदतवाढ नाही, मात्र अर्ज नोंदणी सुरूच राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:05 IST2025-01-10T11:04:29+5:302025-01-10T11:05:11+5:30
५४ हजार ७६८ ग्राहकांनी केले शुल्क अदा; पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध

सिडकोच्या घरांसाठी १ लाख ३४ हजार अर्ज; मुदतवाढ नाही, मात्र अर्ज नोंदणी सुरूच राहणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सिडकोच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. मात्र, या प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच घरांची निवड करण्याच्या मुदतीपर्यंत ग्राहकांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. एकूणच मुदत संपल्यानंतरही संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे अद्याप घरांसाठी अर्जनोंदणी न केलेल्या ग्राहकांना पसंतीचे घर घेण्याची आणखी एक संधी उपलब्ध आहे. सिडकोच्या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ३४ हजार अर्ज आले आहेत.
‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजनेतील घराच्या नोंदणीसाठी १० जानेवारी ही अखेरची मुदत संपत आहे. या प्रक्रियेला तीनदा मुदतवाढ देऊनही सिडकोने घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या; परंतु अर्जनोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना म्हणजे मंगळवारी रात्री प्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती जाहीर केल्या. त्यामुळे दोन दिवसांत अर्ज भरायचा कसा, या विवंचनेत असलेल्या ग्राहकांना सिडकोने दिलासा दिला. आतापर्यंत अर्जनाेंदणी करून शुल्क अदा केलेल्या ग्राहकांसाठी ११ जानेवारीपासून घरांचा पर्याय निवडण्याचा पुढचा टप्पा खुला होणार आहे.
ग्राहकांनी शुल्क केले अदा
९ जानेवारीपर्यंत सिडकोच्या घरासाठी १,३३,९७५ ग्राहकांनी ऑनलाइन अर्जनोंदणी केली आहे. त्यापैकी ५४ हजार ७६८ ग्राहकांनी शुल्क अदा करून ११ जानेवारीपासून खुल्या होणाऱ्या घर निवडीच्या पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध केली आहे.