बैलांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला ठोठावला ३३ लाखांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:06 IST2025-02-06T10:46:10+5:302025-02-06T11:06:20+5:30
खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे.

बैलांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला ठोठावला ३३ लाखांचा दंड!
राजस्थानमधील बिकानेरमध्ये बैलांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. आसाराम असे या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूसाठी न्यायालयाने सरकार आणि पंचायत समितीला जबाबदार धरले आहे. बिकानेर जिल्हा न्यायालयाचे पीठासीन अधिकारी अतुल कुमार सक्सेना यांनी आसारामच्या मृत्यूसाठी पंचायत समिती आणि राज्य सरकारला जबाबदार धरत ३३.२५ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
दोन बैलांच्या हल्ल्यात आसारामचा मृत्यू झाला. आसाराम हा बिकानेरमधील केसरदेसर जाटान गावचा रहिवासी होता. मृत्यूच्या घटनेनंतर आसारामचे नातेवाईक नुकसान भरपाईसाठी न्यायालयात गेले होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने ग्रामपंचायत केसरदेसर जाटान आणि राजस्थान सरकारला दोषी ठरवले आहे.
सामान्य नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि भटक्या प्राण्यांसाठी व्यवस्था करणे, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जनावरांना गोशाळांमध्ये ठेवा किंवा सामान्य लोकांच्या संरक्षणासाठी सरकारी योजनांमध्ये व्यवस्था करा. मात्र, तुम्ही हे करू शकला नाही. त्यामुळे आसारामला आपला जीव गमवावा लागला, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याचबरोबर, पंचायत समिती आणि राज्य सरकार यांना मृताच्या वारसांना संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे ३३.२५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. न्यायालयाने मृताची भरपाई म्हणून ३२ लाख ५२ हजार ६०० रुपये, जीवनसाथी भरपाई म्हणून ४० हजार रुपये, अंतिम संस्कारांसाठी १५ हजार रुपये आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी १५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.