'शॉर्ट कट'साठी तरुणाने घेतली गुगल मॅपची मदत; पण कार थेट पायऱ्यांवर अडकली, पुढे काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:08 IST2024-01-29T16:07:22+5:302024-01-29T16:08:04+5:30
पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदत करत पायऱ्यांवर अडकलेली तरुणांची कार मुख्य रस्त्यावर आणली.

'शॉर्ट कट'साठी तरुणाने घेतली गुगल मॅपची मदत; पण कार थेट पायऱ्यांवर अडकली, पुढे काय घडलं?
एखाद्या नवीन ठिकाणी जाताना प्रवासादरम्यान रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅप अनेकदा उपयुक्त ठरतो. तसंच ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी किंवा शॉर्ट कट शोधण्यासाठीही चालक गुगल मॅपचा वापर करतात. मात्र डोळे झाकून गुगल मॅपवर विश्वास ठेवणं, कधीकधी महागात पडू शकतं. अशीच एक घटना तामिळनाडूतील गुडालूर या शहरातून समोर आली आहे. गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावर जाताना एका तरुणाची कार पायऱ्यांवर अडकल्याचा प्रकार घडला.
वीकेंडला मित्रांसोबत मजा करून गुडालूर इथून एक तरुण आपल्या एसयूव्हीने कर्नाटककडे निघाला होता. रस्ता माहीत नसल्याने त्याने गुगल मॅपचा आधार घ्यायचं ठरवलं. मात्र काही अंतर गेल्यानंतर त्यांची कार थेट पायऱ्यांवर जाऊन अडकली. गुगल मॅपने दाखवलेल्या वाटेत थेट पायऱ्या आल्याने घाबरलेल्या चालकाने जागीच आपली कार थांबवली आणि पोलिसांना मदतीसाठी आवाहन केलं. त्यानंतर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मदत करत पायऱ्यांवर अडकलेली तरुणांची कार मुख्य रस्त्यावर आणली.
दरम्यान, तामिळनाडूतील गुडालूर हे शहर केरळ आणि कर्नाटकदरम्यान एक ट्राय-जंक्शनवर आहे. या परिसरात अनेक तरुण-तरुणी वीकेंडला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात.