Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:32 IST2025-12-23T12:31:57+5:302025-12-23T12:32:38+5:30
डीजेवर डान्स करताना २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला.

Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
आयुष्याचा काहीच भरवसा नाही, कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. हरियाणातील फरीदाबादमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, डान्स करताना एका तरुणाने जीव गमावला. फरीदाबाद येथील सेक्टर ७५ मध्ये असलेल्या 'डी-मार्ट' मॉलमध्ये कंपनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान, डीजेवर डान्स करताना २३ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला.
देवकी नंदन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो गेल्या चार वर्षांपासून या मॉलमध्ये काम करत होता. ही संपूर्ण घटना रविवारी रात्री ९:१५ च्या सुमारास घडली. मॉलच्या बेसमेंटमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जिथे डीजे लावण्यात आला होता आणि सर्व कर्मचारी डान्स करत होते. याच दरम्यान देवकी नंदनचा मृत्यू झाला.
फरीदाबाद में डी मार्ट में डीजे पर डांस करते समय कर्मचारी की मौत.#heartattack#faridabadpic.twitter.com/rRPG6ipdOp
— Vinod Katwal (@Katwal_Vinod) December 23, 2025
डान्स करताना मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
संपूर्ण घटना बेसमेंटमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देवकी नंदन डीजेवर डान्स करताना दिसत आहे आणि अचानक डान्स करता करता तो जमिनीवर कोसळतो. त्याचा हार्ट अटॅकमुळेच मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
पोलीस घटनास्थळी दाखल
तरुण डान्स फ्लोअरवर कोसळल्यानंतर त्याला तातडीने सेक्टर ८ येथील सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. रुग्णालयाकडून पोलिसांना या मृत्यूची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पाठवला.