'तिच्या'साठी काय पण! लुडो खेळता खेळता प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पण पुढे भलतंच घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:27 IST2022-04-20T16:16:32+5:302022-04-20T16:27:24+5:30
Online Game Ludo : बिहारमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.

'तिच्या'साठी काय पण! लुडो खेळता खेळता प्रेम जडलं; एकमेकांसाठी घरदार सोडलं, पण पुढे भलतंच घडलं
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लुडो खेळता खेळता प्रेम जडलं, एकमेकांसाठी घरदार सोडलं पण पुढे भलतंच घडलं. बिहारमध्ये ऑनलाईन गेम खेळत असताना एका तरुण आग्रा (उत्तर प्रदेश) येथील एका तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. यानंतर ती तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला आग्रा येथून छपरा येथे पोहोचली. पण असं काही घडलं की तो तरुण थेट तुरुंगात पोहोचला.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांनी मढौराच्या अगहरा गावातील 19 वर्षीय इंटरच्या विद्यार्थ्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केली. तसेच पोलिसांनी मढौरा येथून एका 18 वर्षीय तरुणीलाही ताब्यात घेतलं आहे. आग्रा येथील तरुणी आणि मढौरा येथील तरुण या दोघांमध्ये मोबाईलवर ऑनलाईन लुडो खेळ खेळताना ओळख झाली. यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते दोन्ही इतके जवळ आले की, 18 वर्षीय तरुणी आपल्या पालकांना न सांगता त्याला भेटायला थेट मढौरा येथे गेली.
दुसरीकडे हरिपर्वत पोलीस ठाणे अंतर्गत गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या या तरुणीच्या पालकांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथील एक तरुणी तीन दिवस आधी मढौरा येथील अगाहरा गावातील एका तरुणाला घेऊन मढौरा येथे आली होती. तर या तरुणाने या तरुणीला मढौरा स्टेशन रोड मालगोदामच्या जवळ एका भाड्याच्या खोलीत थांबवले होते.
तरुणीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर सक्रिय झालेल्या आग्रा पोलिसांनी मोबाईल नंबरवरून तरुणाची ओळख पटवली होती. सर्व माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी तरुण आणि तरुणीला ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.