लोकल ट्रेनमध्ये, विमानात एका ठराविक वजनापेक्षा जास्त सामान सोबत असेल तर त्या प्रवाशाला जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच आता मेट्रोतही आकारले जात आहेत. एका प्रवाशाला बंगळुरू मेट्रोने एका बॅगेसाठी ३० रुपये आकारले आहेत. या प्रवाशाने याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
बंगळुरू मेट्रोने मला एका बॅगेसाठी ३० रुपये चार्ज केल्याचा आरोप या युजरने केला आहे. यावरून सामानावर वसूल केल्या जात असलेल्या पैशांवर लोक आक्षेप नोंदवू लागले आहेत. अविनाश चंचल नावाच्या युजरने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे.
बंगळुरू मेट्रो स्टेशनवर मला या बॅगेसाठी ३० रुपये द्यावे लागले आहेत, यामुळे मी हैराण झालो आहे. बंगळुरू मेट्रोच्या सुविधेपासून कसे वंचित ठेवले जात आहे, हे त्याचे एक उदाहरण आहे, असे त्याने म्हटले आहे. यावर लोकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
बंगळुरु मेट्रोमध्ये नुकतीच लगेज फी लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार जर बॅग किंवा सामान हे ६० सेमी (लांबी) × ४५ सेमी (रुंदी) × २५ सेमी (उंची) पेक्षा मोठे असेल तर प्रवाशांना प्रति बॅग ३० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर हे शुल्क भरले नाही आणि सापडल्यास २५० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. एवढेच नाही तर मेट्रो अधिकाऱ्याकडे तक्रार गेली तर तो मेट्रोतून बाहेरही हाकलू शकणार आहे. लगेजचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना कस्टमर केअर सेंटरला जावे लागणार आहे.