‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:58 IST2025-11-07T12:56:33+5:302025-11-07T12:58:14+5:30
Uttarakhand Crime News: पेशाने केमिकल इंजिनियर असलेल्या एका तरुणाने शेअर बाजारात झालेलं प्रचंड नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे त्रस्त होऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे घडली आहे. लव कुमार असं या तरुणाचं नाव आहे.

‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
पेशाने केमिकल इंजिनियर असलेल्या एका तरुणाने शेअर बाजारात झालेलं प्रचंड नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे त्रस्त होऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे घडली आहे. लव कुमार असं या तरुणाचं नाव असून, तो हरिद्वारमदील अरिहंत विहार कॉलनीमध्ये वास्तव्यास होता. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये आर्थिक संकट आणि मालमत्तेच्या वादातून आपण जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक सत्येंद्र भंडारी यांनी सांगितले की, ३५ वर्षांच्या लव कुमार याने आपल्या खोलीत हिटरवर कोळसा पेटवून धूर केला आणि आतून दरवाजा बंद केला, त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड गॅस तयार होऊन श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा खोलीमध्ये पूर्णपणे धूर भरलेला होता. तसे लव कुमार हा बेशुद्धावस्थेत होता. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लव कुमार हा गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारामध्ये झालेल्या नुकसानामुळे चिंतीत होते. त्याने याबाबत आपल्या कुटुंबीयांसोबतही चर्चा केली होती. त्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत होती. या आर्थिक नुकसानानंतर त्याने मद्यपान करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे घरात वाद वाढला होता. तसेच त्याची पत्नीही मुलांना सोबत घेऊन माहेरी निघून गेली होती.
दरम्यान, मृत तरुणाने जीवन संपवण्यापूर्वी पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला होता. या मेसेजमधून त्याने जीवन संपवण्याची धकमी दिली होती. तसेच ‘मी आता खोलीमध्ये गुदमरून मरून जाईन’, असे तो म्हणाला होता. त्यानंतर पत्नीने त्याला वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरून काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे तिने कुटुंबीयांनी या प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी दरवाजा उघडून मृतदेह बाहेर काढला आणि रुग्णालयात पाठवला. आता या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.