'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:04 IST2025-01-13T15:03:32+5:302025-01-13T15:04:04+5:30

'कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला जाते.'

'You fulfilled your promise in 4 months, thank you very much', Omar Abdullah praises PM Modi | 'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

Narendra Modi in Jammu-Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(13 जानेवारी) जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमध्ये झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah), नायज राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही (Nitin Gakari) उपस्थित होते. बोगद्याच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांततापूर्ण निवडणुका पार पाडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणतात, 'आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमधील कार्यक्रमात तुम्ही (पीएम मोदी) 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही म्हणाला होता की, तुम्ही दिल(मन) आणि दिल्लीतील अंतर कमी करण्याचे काम करत आहात आणि हे तुमच्या कामातून सिद्ध झाले आहे. तुम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेला सांगितले होते की, लवकरच निवडणुका होतील आणि लोकांना त्यांच्या मतांद्वारे सरकार निवडण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचे शब्द खरे ठरवले आणि 4 महिन्यांत निवडणुका झाल्या. नवे सरकार निवडून आले आणि मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे.

लोकांनी निवडणुकीत उत्साहाने सहभाग घेतला आणि कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार आली नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि भारताच्या निवडणूक आयोगाला जाते. तुम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासनही दिले होते. जेव्हा लोक मला याबद्दल विचारतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, पंतप्रधान मोदींनी निवडणुका घेण्याचे आश्वासन पूर्ण केले. मला विश्वास आहे की, लवकरच हे वचनही पूर्ण होईल आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा बहाल होईल, असा विश्वास अब्दुल्ला यांनी यावेळी व्यक्त केला.

बोगद्यामुळे सोनमर्ग श्रीनगरशी जोडला जाईल
मुख्यमंत्री पुढे म्हणतात, या बोगद्याचे उद्घाटन तुमच्या (पीएम मोदी) हस्ते झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील जनता आज खूप आनंदी आहे. या बोगद्याची पायाभरणी झाली, तेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत होतो. तेव्हापासून बराच काळ लोटला, अनेक अडचणी आल्या, प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. पण, नंतर तुमच्या हातून आणि नितीन गडकरींच्या हातामुळे या प्रकल्पाला गती मिळाली.

पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे दुर्गम भागांना सीमेवरील युद्धबंदीचा खूप फायदा झाला आहे. माछिल, गुरेझ, कर्नाह किंवा केरन असो, अधिक पर्यटकांच्या आगमनाने लोकांना विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होत आहे. सोनमर्गमधील झेड-मोर्ह बोगदा सुरू झाल्यामुळे वरच्या भागातील लोकांना यापुढे मैदानी भागात जाण्याची गरज भासणार नाही. वर्षभर ते श्रीनगरशी जोडले जातील. एक तासाचे अंतर 15 मिनिटांत कापले जाईल, याबद्दल सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: 'You fulfilled your promise in 4 months, thank you very much', Omar Abdullah praises PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.