योगी आदित्यनाथ सरकार नववधूला देणार मोबाइल आणि ३५ हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 20:40 IST2017-12-16T20:37:08+5:302017-12-16T20:40:47+5:30
उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे.

योगी आदित्यनाथ सरकार नववधूला देणार मोबाइल आणि ३५ हजार रुपये
लखनऊ- उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे. तसंच या योजनेअंतर्गत लग्नासाठी पात्र तरूणींना 35 हजार रूपये दिले जाणार आहेत. सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.
योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला 20 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. हे पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असं एकूण 10 हजार रुपयांचं सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल. गरजू लोकांच्या सामूहिक विवाहसोहळ्यासाठी नोंदणीचं काम लवकरच सुरु होईल. यासाठी प्रशासनाकडे एक कोटी 66 लाख 60 हजार रुपयांचा निधी मिळाल्या असल्याचं, वाराणसीचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. के. यादव सांगितलं.
अर्जांची चाचपणी झाल्यानंतर लग्नाची तारीख ठरवली जाईल असे सांगतानाच मुलाकडील आणि मुलीकडील नातेवाईकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी पाच हजार रुपये खर्च केले जातील अशी माहिती यादव यांनी दिली. उत्तर प्रदेशमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी कमीत कमी दहा जोडप्यांनी नोंदणी करणे गरजेचे असते. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून बनारस जिल्हा प्रशासनाने २० ते ३० जानेवारी दरम्यान १०० जोपड्यांची लग्ने लावून देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याचेही यादव म्हणाले.