योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:33 IST2025-05-04T09:32:24+5:302025-05-04T09:33:56+5:30

शिवानंद बाबा यांच्या आधारकार्डवरील नोंदणीनुसार त्यांची जन्म तारीख ८ ऑगस्ट १८९६ आहे. बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता.

Yoga guru Swami Padmashri Shivanand Baba passed away at the age of 128 | योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वाराणसी - १२८ वर्षीय योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी शनिवारी रात्री ८.४५ मिनिटांनी जगाचा निरोप घेतला आहे. मागील ३ दिवसांपासून ते BHU इथं उपचार घेत होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवानंद बाबा यांच्या निधनानं वाराणसीत शोककळा पसरली आहे. शिवानंद बाबा यांचे अनुयायी देशविदेशात आहेत. त्यामुळे शिवानंद बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव दुर्गाकंड इथल्या आश्रमात ठेवले जाणार आहे. सोमवारी शिवानंद बाबा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः शिवानंद बाबांच्या योगाभ्यासाचे अनुयायी होते. ३ वर्षापूर्वी केंद्र सरकारने शिवानंद बाबा यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. अलीकडेच प्रयागराज येथे शिवानंद बाबा यांचा कॅम्प लागला होता. त्यांनी महाकुंभ येथे जात पवित्र स्नानही केले होते. शिवानंद बाबा यांच्या आधारकार्डवरील नोंदणीनुसार त्यांची जन्म तारीख ८ ऑगस्ट १८९६ आहे. बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. भूकबळीमुळे त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून शिवानंद बाबा नेहमी अर्धपोटी जेवण करायचे. 

८ ऑगस्ट १८९६ साली शिवानंद बाबा यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबात ४ जण होते. ते, आई वडील आणि मोठी बहीण असं त्यांचं कुटुंब होते. भिक्षा मागून त्यांचे कुटुंब उदरनिर्वाह करायचे. काही दिवस असेच गेले, कालांतराने कुटुंबासमोर अडचणी आल्या. घरात खाण्यासाठीही पैसे शिल्लक नव्हते तेव्हा आई वडिलांना चिमुकल्या शिवानंदची चिंता सतावू लागली. त्यामुळे वयाच्या ४ व्या वर्षी त्यांना बाबा श्री ओकारनंद गोस्वामी यांच्याकडे सुपूर्द केले, जेणेकरून त्याचा सांभाळ नीट होईल. लहानपणापासूनच शिवानंद यांनी गुरूंकडे राहून शिक्षण घेणे सुरू केले.

जवळपास २ वर्ष हे सुरू होते, एकेदिवशी शिवानंद यांचे आई वडील आणि बहीण भिक्षा मागण्यासाठी गेले. दारोदारी भटकले तरीही खायला काही मिळाले नाही. दमून ते घरी परतले. अनेक दिवस हेच सुरू होते. भिक्षा मागायला जायचे परंतु रिकाम्या हाती परतायचे. भूकेने कुटुंब व्याकूळ झाले. अखेर एकेदिवशी भूकेमुळे शिवानंदच्या आई वडिलांसह बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर शिवानंदची संपूर्ण जबाबदारी बाबा ओंकारनंद यांनी घेतली. शिवानंद कधीही शाळेत गेले नाहीत. गुरूकडे राहून व्यावहारिक ज्ञान आणि शिक्षण घेतले. गुरूंकडून त्यांनी योग शिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षीपासून ते योगा करत होते. जगभ्रमंती करून योग साधना करण्याचे गुरूंनी आदेश दिले त्यानंतर जवळपास ३४ देशात ते फिरले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनाही शिवानंद बाबा यांनी जवळून पाहिले. 

ते परदेशात राहायचे परंतु त्यांचे मन भारतात होते. त्यासाठी १९७७ साली ते वृंदावनला आले. इथे येऊन त्यांनी भारत भ्रमंती केली. जागोजागी जात लोकांना योग शिकवला. अखेरच्या काळात ते वाराणसीत स्थिरावले. शिवानंद बाबाच्या निरोगी आयुष्याचं गुपित योगा होते. ते रोज पहाटे ३ वाजता उठायचे. थंडी असो वा गरमी, नेहमी थंड पाण्यानेच आंघोळ करायचे. त्यानंतर १ तास योगा करत होते. दिवसातून ३ वेळा तीन मिनिटांसाठी ते सर्वांगासन करायचे. त्यानंतर १ मिनिटे शवासन, पवन मुक्तासनसह अनेक आसने दिवसभर करत होते. रोज संध्याकाळी ८ वाजता पुन्हा स्नान करायचे. कपडे, धुणी भांडी स्वत: करत होते. 
 

Web Title: Yoga guru Swami Padmashri Shivanand Baba passed away at the age of 128

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.