राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरुनच आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही आव्हाडांवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक धर्मावर कलंक लावण्याचे काम करत आहेत, असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक धर्मावर कलंक लावण्याचे काम करत आहेत. ज्या धर्मात आणि संस्कृतीत त्यांचा जन्म झाला, ज्या पूर्वजांचे ते वंशज आहेत, त्यांनाच ते हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद बोलत आहेत. पण मतांसाठी भगवा दहशतवाद नाही, असे सांगतात. जेव्हा एखादा प्रसंग येतो, त्यावेळी असेही म्हणतात की, दहशदवाद्याला धर्म नसतो. परंतु, हिंदू, हिंदुत्व आणि सनातन धर्माला दहशतवादाशी जोडून सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक वाद निर्माण केला जात आहे. शिवाय, ते देशाच्या संविधानच्या भावनेच्या विरोधात काम करत आहेत. ईश्वर त्यांना बुद्धी देवो आणि लवकरच त्यांना राजकारणातून मोक्ष मिळावा, अशी प्रार्थना करतो."
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
"सनातन धर्म नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नव्हती, तो केवळ एक विचारसरणी आहे ज्यामुळे भारताचे नुकसान झाले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, तथाकथित सनातन धर्माचे नव्हे. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा निर्माण केला, संभाजी महाराजांची बदनामी केली, ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न केला आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण व माती फेकली. शाहू महाराजांच्या हत्येचा कटदेखील सनातन धर्माने रचला होता", असे जितेंद्र आव्हाडांनी म्हटले आहे.