लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 16:58 IST2023-05-18T16:57:56+5:302023-05-18T16:58:21+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याने साक्षी मलिक संतापली; पैलवानांनी पदके परत करण्याचे दिले संकेत
brij Bhushan Singh । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधातील आंदोलक पैलवानांची आखाड्याबाहेरील कुस्ती अद्याप सुरूच आहे. २३ एप्रिलपासून पैलवान आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनातील प्रमुख चेहरा साक्षी मलिक असून तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, या अशा ताकदवान व्यक्तीच्या विरोधात जाण्यासाठी खूप हिम्मत लागते. याशिवाय लैंगिक छळाचा पुरावा मागितल्याचा उल्लेख देखील यावेळी साक्षीने केला.
साक्षी मलिकने म्हटले की, आम्ही आता निर्णय घेतला आहे की, लैंगिक छळ करणाऱ्यांविरूद्ध बोलण्याची वेळ आलेली आहे. तिने सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना धमकावले जात असून ज्या शाळेत ती शिकते, तिथे तिची जन्मतारीख बदलण्याचा प्रयत्न झाला. जेणेकरून हे समोर येऊ शकेल की ती अल्पवयीन मुलगी नाही.
तपासात मागितले पुरावे
मलिकने सांगितले की, समितीच्या सदस्यांनी फोटो आणि रेकॉर्डिंगसारखे पुरावे मागितले आहेत. "पीडितांनी सांगितले की, अशी घटना कोणासोबत झाली असेल तर ती संबंधित पीडितेला आधी कशी माहिती असेल? जर कोणत्या महिलेला माहिती असेल की, तिचा लैंगिक छळ होणार आहे तर ती त्या ठिकाणी जाणारच नाही. जर महिला सांगत असेल तिचा लैंगिक छळ झाला आहे, तर हाच सर्वात मोठा पुरावा आहे. कोणतीच महिला असे खोटे आरोप करणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, पोलिसांकडून योग्य तपास केला जाईल", असे साक्षी मलिकने स्पष्ट केले.
खेळाडू परत करणार?
आंदोलकांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांना अटक न केल्यास पदके परत करण्याचे संकेत दिले आहेत. साक्षी मलिकने म्हटले, "भारत सरकारने आम्हाला हे अवॉर्ड्स दिले आहेत. पण कारवाई झाली नाही तर याचा काय उपयोग? आम्ही मागील २५ दिवसांपासून जंतरमतरवर बसलो आहोत. त्यामुळे जर आमच्या तक्रारी ऐकल्या जात नसतील तर पदके किंवा अवॉर्डस यांचा काय उपयोग."