‘एआय’च्या जगातील दिग्गज दिल्लीत, जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:04 IST2026-02-17T10:00:23+5:302026-02-17T10:04:02+5:30
भारत मंडपममध्ये गर्दीचा महापूर; रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि सुरक्षित एआय विषयाबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता

‘एआय’च्या जगातील दिग्गज दिल्लीत, जगातील सर्वांत मोठ्या एआय परिषदेला सुरुवात
नवी दिल्ली : भविष्यातील जगाची दिशा ठरवणाऱ्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या शिखर परिषदेचा सोमवारी राजधानीतील ‘भारत मंडपम’ येथे दिमाखात शुभारंभ झाला. ‘एआय इम्पॅक्ट समिट’च्या पहिल्याच दिवशी जगभरातील तंत्रज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योजकांनी मोठी गर्दी केल्याने राजधानीत जणू तंत्रज्ञानाचा महासागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारताने या व्यासपीठावरून ‘एआय’च्या लोकशाहीकरणाचा आणि ‘ग्लोबल एआय कॉमन्स’चा नारा दिला आहे.
अवघ्या जगाला जोडून जगाचा निरोप घेतला...; 'ग्रँडफादर ऑफ इंटरनेट' डेव्हिड जे. फार्बर यांचे निधन
सकाळी ९:३० वाजता परिषदेचे दरवाजे उघडण्यापूर्वीच प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ५०० हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आलेल्या या परिषदेत अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केले. सभागृहे क्षमतेपेक्षा जास्त भरल्यामुळे अनेक ठिकाणी ‘नो एंट्री’चे फलक लावावे लागले. रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि सुरक्षित एआय या विषयांवरील चर्चासत्रांना सर्वाधिक गर्दी दिसून आली. या परिषदेत ३,२५० हून अधिक वक्ते मार्गदर्शन करतील.
मुलांमध्ये लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम आणि सुरक्षित ड्रायव्हिंगची शिस्त लागावी, यासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात एआयच्या मदतीने ड्रायव्हिंगचे मूलभूत शिक्षण दिले जाणार आहे. आयआयटी मद्रास यावर काम करत असून, भविष्यात ते अनिवार्य करण्याचाही विचार आहे, असे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले.
१९ आणि २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या समारोपाच्या सत्रात पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांसारखे २० हून अधिक जागतिक नेते सहभागी होणार आहेत.
पालकांसाठी अन् सरकारसाठी मोठे आव्हान
हे तंत्रज्ञान एका दुधारी तलवारीसारखे आहे. एआयमुळे मुलांचे शिक्षण सोपे झाले, मात्र धोके वाढले. मुलांना या तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा व ते सुरक्षित राहावेत, ही सरकारची जबाबदारी आहे, असे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद म्हणाले.
दिग्गजांची मांदियाळी : गुगल, एनवीडिया, ॲमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय यांसारख्या दिग्गज कंपन्यांची प्रदर्शने.
३०० स्टॉल्स : एआयमधील नवनवीन संशोधने आणि स्वदेशी कंपन्यांच्या प्रयोगांचे सादरीकरण.
जागतिक पाहुणे : सुंदर पिचाई (अल्फाबेट), सॅम ऑल्टमन (ओपनएआय) आणि डारियो अमोदेई (अँथ्रॉपिक) यांचे सत्र बुधवारपासून सुरू होणार आहे.
थीम काय? : ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ या त्रिसूत्रीवर आधारित ही एआय परिषद आहे. यात भारत जगाला नवी दिशा देईल.