जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:17 IST2025-09-28T10:16:16+5:302025-09-28T10:17:00+5:30
सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन सिंग राणावत यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क येथे अखेरचा श्वास घेतला.

जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन सिंग राणावत यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क येथे अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षाचे होते. डॉ. राणावत यांनी अनेक दशके ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. भारत सरकारकडून २००१ मध्ये पद्मभूषण, अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन्सकडून जीवन गौरव पुरस्कार, तसेच अमेरिकास्थित भारतीय संघटनेतर्फे सश्रुत पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राणावत यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या गुडघ्यावर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती.
डॉ. राणावत यांनी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या नावावर अनेक वैद्यकीय शोधनिबंध आणि नवीन सर्जिकल टेक्निक्सचे पेटंट्स आहेत. त्यांनी भारतात अनेक शस्त्रक्रिया केल्या आणि भारतीय डॉक्टरांना मार्गदर्शनही केले. डॉ. राणावत यांनी राणावत ऑर्थोपेडिक सेंटरची स्थापना केली होती, जे आजही अमेरिकेत सांध्यांशी संबंधित आजारांवर अग्रगण्य मानले जाते. त्यांनी अनेक डॉक्टरांना प्रशिक्षित केले असून, त्यांचे विद्यार्थी जगभर काम करत आहेत.
राणावत फाउंडेशनची स्थापना
१९८६ मध्ये त्यांनी राणावत फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली. पुणे व इतर ठिकाणच्या रुग्णालयांशी भागीदारी करून या संस्थेने भारतीय शल्यचिकित्सकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. तसेच ज्यांना या शस्त्रक्रियेची किंमत परवडत नाही, अशा रुग्णांना मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करून दिले.
ऑर्थोपेडिक्समधील भीष्म पितामह हरपला
डॉ. राणावत यांच्या निधनाने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील भीम पितामह हरविल्याची भावना सैफी आणि जेजे रुग्णालयात सांधा प्रत्यारोपण शास्त्रीय करणारे डॉ. संगीत गव्हाळे यांनी व्यक्त केली.