एका रात्रीत लाकूडतोड्या करोडपती; नातेवाईकांना बाईक गिफ्ट करून अचानक फरार अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 13:41 IST2022-01-16T13:36:27+5:302022-01-16T13:41:30+5:30
लाकूडतोड्याबद्दल गावात उलटसुलट चर्चा; विविध अफवा पसरताच मुलासह अंडरग्राऊंड

एका रात्रीत लाकूडतोड्या करोडपती; नातेवाईकांना बाईक गिफ्ट करून अचानक फरार अन् मग...
पाटणा: बिहारच्या किशनगंजमध्ये एक गरीब लाकूडतोड्या रातोरात कोट्यधीश झाला आहे. यानंतर गावात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, अफवा परसल्या. लतिफ नावाचा लाकूडतोड्या आणि त्याचा मुलगा उबेदुल यांना १५ दिवसांपूर्वी गुप्तधन मिळालं. त्यामुळे ते श्रीमंत झाले असा काहींचा दावा आहे. तर लतिफला लॉटरी लागली. तो १ कोटी रुपये जिंकला, असा काही ग्रामस्थांचा दावा आहे. हे प्रकरण एसडीएमकडे पोहोचलं. त्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
किशनगंजमधील टेऊसा पंचायतीमधील लतिफ नावाचा लाकूडतोड्या रातोरात कोट्यधीश झाला. त्यामुळे ग्रामस्थ चकित झाले. त्यानंतर विविध प्रकारच्या अफवा गावात पसरल्या. त्यामुळे लतिफ आणि उबेदुल भूमिगत झाले. लॉटरी लागल्यानंतर उबेदुलनं नातेवाईकांना ७ दुचाकी गिफ्ट दिल्या. नवा ट्रॅक्टर आणि जमीन खरेदी केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. याशिवाय पक्कं घरदेखील बांधलं.
बिहारमध्ये लॉटरी तिकिटावर बंदी आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधून लाकूडतोड्यानं लॉटरीचं तिकिट खरेदी केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. रातोरात कोट्यधीश झाल्याची बातमी गावात पसरल्यानंतर पिता, पुत्रांनी पळ काढला. आता पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. दोघे पकडले गेल्यानंतर सर्व बाबी उघड होतील, असं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणाची चौकशी आयकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालयाकडून करण्यात येणार असल्याची माहिती किशनगंजचे एसडीएम शाहनवाज अहमद नियाजी यांनी दिली. सध्या या प्रकरणाची किशनगंजमध्ये जोरदार चर्चा आहे. लाकूडतोड्याला एका रात्रीत इतकी रक्कम कुठून मिळाली हा प्रश्न अनेकांना पडला आहे.