मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये आले अरबो रुपये! तुम्हीही वाचली 'ही' घटना? पण बँक म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:59 IST2025-08-05T08:37:02+5:302025-08-06T11:59:28+5:30
एका मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये अरबो रुपये आल्याची घटना चांगलीच चर्चेत आली होती. मात्र, बँकेने आता यावर खुलासा केला आहे.

मृत महिलेच्या अकाऊंटमध्ये आले अरबो रुपये! तुम्हीही वाचली 'ही' घटना? पण बँक म्हणते...
एखादा सामान्य व्यक्ती आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई विचारपूर्वक वापरतो. पण अचानक तुमच्या खात्यात अरबो रुपये आले तर... असाच एक प्रकार ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडला आहे. ग्रेटर नोएडाच्या उंची दनकौर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. पण,आता अचानक मृत महिलेच्या बँक खात्यात तब्बल एक अब्ज रुपये आले. पैशांबद्दल कळताच, मृत महिलेचा मुलगा संबंधित बँकेत गेला आणि माहिती मिळवू इच्छित होता. बँक अधिकाऱ्याने त्या तरुणाला खाते गोठवल्याचे कळवले.
हे संपूर्ण प्रकरण ग्रेटर नोएडाच्या दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील उंची दनकौर परिसरात घडले आहे, जिथे एका मृत महिलेच्या बँक खात्यात अचानक १०,०१,३५,६०,००,००,० ०,००,००,०१,००,२३,५६,००,००,००,००,२९९ रुपये जमा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. ही बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. अशाच आणखी काही घटना समोर आल्याचे चर्चेत आले होते. मात्र, आता बँकेने यावर स्पष्टीकरण दिले आहे. "ग्राहकांच्या खात्यात असामान्यपणे मोठी रक्कम असल्याचे सांगणारे रिपोर्ट चुकीचे आहेत. या रिपोर्ट्सच्या पार्श्वभूमीवर, आम्ही ग्राहकांना कोटकच्या मोबाइल बँकिंग अॅप किंवा नेट बँकिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांच्या खात्याची माहिती तपासण्यास सांगितले आहे. कोटक महिंद्रा बँक पुष्टी करते की, आमच्या सिस्टम सामान्यपणे कार्यरत आहेत, सर्व सेवा सुरक्षित आणि पूर्णपणे कार्यरत आहेत", असे बँकेने म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मृत महिला गायत्री देवी यांचा मुलगा दीपक कुमार याने सांगितले की, त्यांच्या आईचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर तो कोटक महिंद्रा बँकेतील त्यांच्या खात्याशी जोडलेला युपीआय वापरत होता. सोमवारी संध्याकाळी दीपकच्या मोबाईलवर एक मेसेज आला, ज्यामध्ये त्यांना कळवण्यात आले की खात्यात मोठी रक्कम जमा झाली आहे.
दीपकने बॅलन्स तपासताच, एवढी मोठी रक्कम पाहून तो हैराण झाला. तो ताबडतोब बँकेत जाऊन त्याबद्दल चौकशी केली, परंतु बँक कर्मचाऱ्यांनी खाते गोठवण्यात आल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. बँक व्यवस्थापनाने हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवले आहे, जे आता या असामान्य व्यवहाराची चौकशी करत आहे.
बँक खाते गोठवले
दीपकने सांगितले की त्याला खात्यातून युपीआयद्वारे पेमेंट करायचे होते परंतु व्यवहार अयशस्वी झाला. यानंतर, जेव्हा त्याने बॅलन्स तपासला, तेव्हा हा धक्कादायक आकडा समोर आला. बँकेने खबरदारी म्हणून खाते ब्लॉक केले आहे आणि संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.
आयकर विभाग आणि पोलीस देखरेख
सध्या, मृत महिलेच्या खात्यात इतकी मोठी रक्कम कशी आणि कोणत्या माध्यमातून पोहोचली याचा तपास आयकर विभाग करत आहे. स्थानिक पोलिसांना अद्याप या प्रकरणाची कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. अशी कोणतीही माहिती मिळाल्यास सखोल चौकशी केली जाईल, असे प्रभारी कोतवाली प्रभारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.