माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 02:21 PM2019-02-28T14:21:42+5:302019-02-28T14:24:05+5:30

अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले.

wing commander abhinandan father writes an emotional letter | माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र  

माझ्या मुलाचा मला अभिमान आहे, अभिनंदन यांच्या वडिलांचे भावूक पत्र  

ठळक मुद्देअभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.संपूर्ण देश अभिनंदन वर्धमान सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करत आहे. अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : भारतीय हद्दीत बुधवारी सकाळी घुसून हल्ला करू पाहणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चोख उत्तर देत पिटाळून लावले आणि पाकिस्तानचे एफ-16 विमान त्यांच्याच हद्दीत पाडले. यावेळी पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले. तत्पूर्वी मिग-21 लढाऊ विमानातून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.

अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. तसेच, संपूर्ण देश अभिनंदन वर्धमान सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करत आहे. सोशल मीडियावरही अभिनंदन वर्धमान यांना मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम सुरु आहे. त्यामुळे अभिनंदन वर्धमान यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश लिहिला आहे. 

अभिनंदन वर्धमान यांचे वडील सिमहाकुट्टी वर्धमान भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले. सिमहाकुट्टी वर्धमान यांनी संदेशात म्हटले आहे की, 'मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या धाडसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे'. याचबरोबर, महत्वाच्यावेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आपला आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत आहे, असेही सिमहाकुट्टी वर्धमान यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या मंगळवारी भारतीय वायुसेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत भारतीय वायु सेनेच्या 'मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारावाईनंतर बिथरलेल्या पाकिस्ताने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तवाणाचे वातावरण आहे.  
 

Web Title: wing commander abhinandan father writes an emotional letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.