आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 21:59 IST2025-09-06T21:58:06+5:302025-09-06T21:59:54+5:30
मोदी पुढे म्हणाले, "युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली...

आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी, युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसंदर्भात चर्चा केली. तसेच, भारत-फ्रान्स संबंधांचेही सकारात्मक मूल्यमापन केले. दोन्ही नेत्यांनी फोनवर चर्चा केली. तत्पूर्वी, गेल्या महिन्यात व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे युक्रेनियन समकक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली. तेव्हा या चर्चेत सहभागी झालेल्या युरोपीय नेत्यांमध्ये मॅक्रॉन देखील होते.
या चर्चेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने सांगितले की, "राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चांगली चर्चा झाली. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले." मोदी पुढे म्हणाले, "युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. जागतिक शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीने भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे."
काय म्हणाले मॅक्रॉन -
दरम्यान, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी (६ सप्टेंबर २०२५) पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली. मॅक्रॉन म्हणाले, "मी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. मी त्यांना, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि कोएलिशन ऑफ द विलिंग मधील आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरुवारी पॅरिस येथे झालेल्या बैठकीत एकत्रितपणे विचार केलेल्या मुद्द्यांची माहिती दिली.
मॅक्रॉन पुढे म्हणाले "युक्रेनसंदर्भात भारत आणि फ्रान्सची इच्छा सारखीच आहे. युक्रेनमध्ये त्वरित आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित व्हायला हवी. आमची मैत्री आणि धोरणात्मक भागीदारीच्या आधारावर, आम्ही शांततेच्या दृष्टीने पुढे जात राहू."